बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुक्यातील झाडशहापूर येथील कु. सरिता शेट्टुपा काकतीकर हिची भारतीय नौदलामध्ये अभिनंदनीय निवड झाली असून संपूर्ण कर्नाटकातील निवड झालेल्या 6 मुलींपैकी सरिता ही बेळगाव जिल्ह्यातील एकमेव मुलगी आहे हे विशेष होय. या निवडीद्वारे प्रचंड आत्मविश्वास आणि मेहनत घेण्याची तयारी असेल तर आपण आपले ध्येय निश्चितपणे गाठू शकतो हे सरिताने दाखवून दिले आहे.
झाडशहापुर (ता. जि. बेळगाव) येथील कु. सरिता शट्टुप्पा काकतीकर ही 15 मे 2024 ला घेण्यात आलेल्या परीक्षेच्या माध्यमातून भारतीय नौदल दलातील प्रवेशास पात्र ठरली आहे. घरची परस्थीती अत्यंत बिकट असलेल्या सरिता हिच्या आई-वडिलांनी आपल्या तीन मुली व एक मुलगा यांचे शिक्षण काटकसरीने पूर्ण केले.
सरिता हिने पहीली ते दहावीपर्यंतच्या शिक्षणानंतर मराठा मंडळ महाविद्यालय खानापूर येथे विज्ञान शाखेचे 12वी पर्यँतचे शिक्षण पुर्ण केले. सैन्य दलाविषयी लहानपणापासूनच आकर्षण असलेल्या सरिता हिने वयाच्या 18 वर्षापासून भारतीय सैन्य दलात भरती होण्यासाठी जिद्दीने तयारी सुरू केली.
नौदलाच्या भरती प्रक्रीयेमध्ये तिने प्रथम शारीरीक चांचणीत 100 पेकी 90 गुण मिळविले. त्यानंतर लेखी परीक्षा प्रक्रीयेत 100 पैकी 80 गुण मिळवत वैद्यकीय चांचणीत उतीर्ण होउन भारतीय नौदलात प्रवेश मिळवला आहे. घरच्या अत्यंत काटकसरीच्या परिस्थितीत देखील प्रचंड आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर कु. सरिता हिने मेहनतीने मिळवलेले हे यश आजच्या युवा पिढीसाठी आदर्शवत आहे.
भारतीय नौदलाच्या भरती प्रक्रीयेत संपुर्ण कर्नाटकात फक्त 6 मुलींचीच निवड झाली आणि त्यामध्ये बेळगाव जिल्ह्यातून निवड झालेली कु. सरिता काकतीकर ही एकमेव आहे हे विशेष होय.
नौदलाच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलात देशसेवेसाठी निवड झाल्याचा सन्मान मिळाल्याबद्दल कु. सरिता हिचे झाडशहापूर गावासह सर्वत्र अभिनंदन होत आहे.