बेळगाव लाईव्ह:श्री महर्षी वाल्मिकी यांच्या स्मरणार्थ अनुसूचित जाती -जमातीतील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या साधकांना दिल्या जाणाऱ्या यंदाच्या ‘श्री महर्षी वाल्मिकी पुरस्कार’ विजेत्यांची घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली आहे.
हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळवणाऱ्यांमध्ये बेळगावच्या गांधीनगर येथील सामाजिक कार्यकर्ते राजशेखर तळवार यांचाही समावेश आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काल बुधवारी 2024 सालातील राज्यस्तरीय श्री महर्षी वाल्मिकी पुरस्कार विजय त्यांची नावे जाहीर केली. राज्यातील 5 महसूल विभागातून प्रत्येकी एकाची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
श्री महर्षी वाल्मिकी पुरस्कार प्राप्त साधक पुढील प्रमाणे आहेत. बेंगलोर विभाग : श्री किलारी जोगय्या बिन किलारी बोरय्या, म्हैसूर विभाग : डॉ. रत्नम्मा एस., बेळगाव विभाग : श्री राजशेखर तळवार, बेंगलोर केंद्र : श्री के. एस. मृत्युंजय, कलबुर्गी विभाग : श्रीमती रत्नम्मा बी. सोगी.
यंदाचा श्री महर्षी वाल्मिकी पुरस्कार मिळवणारे गांधीनगर बेळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते राजशेखर तळवार हे आदिवासी समुदायातील जनतेत शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छते विषयी जागृती करत आहेत. आदिवासी समुदायाच्या समस्या विविध खात्याच्या निदर्शनास आणून त्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले आहेत. डोंगराळ भागातील आदिवासी समुदायांमध्ये शिक्षणाविषयी जागृती निर्माण करणे.
शिक्षणासंबंधी शिबिरांचे आयोजन सरकारी मदत मिळावी आणि या समुदायातील विद्यार्थ्यांचे पुढील शिक्षण सुरू राहावे याकरिता ते प्रयत्नशील असतात. राजशेखर तळवार हे आदिवासींच्या उन्नतीसाठी करत असलेल्या सामाजिक सेवेची दखल घेत राज्य सरकारने बेळगाव विभागातून त्यांची यंदाच्या श्री महर्षी वाल्मिकी पुरस्कारासाठी निवड केली आहे. या पुरस्काराचे स्वरूप 20 ग्रॅमचे सुवर्ण पदक, मानपत्र आणि 5 लाख रु. रोख असे आहे. बेंगलोर येथे लवकरच होणाऱ्या वाल्मिकी जयंती कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
यंदाच्या 2024 या सालातील श्री महर्षी वाल्मीकी पुरस्कारासाठी साधकांची निवड करण्याकरिता जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश के. एच. मल्लेशप्पा यांच्या नेतृत्वाखाली निवड समिती नेमण्यात आली होती. या समितीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या उपरोक्त 5 साधकांची शिफारस राज्य सरकारकडे केली होती. ती शिफारस ग्राह्य मानून राज्य सरकारने वरील प्रमाणे पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली आहे.