बेळगाव लाईव्ह : यंदा पाऊसमान समाधानकारक पेक्षाही अधिक झाले असून कित्येक भागात अतिवृष्टीमुळे आधीच तडाखा बसला आहे.
सप्टेंबरच्या सुरुवातीपासून आणि सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने जोरदार बॅटिंग केली आणि त्यानंतर पुन्हा ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात परतीच्या पावसाने जोरदार बरसण्यास सुरुवात केली आहे.
विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी साचल्याचे चित्र दिसत असून भातपिकालाही फटका बसला आहे.
जोरदार पावसामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. हातातोंडाशी आलेले पीक वाया जाणार असल्याने बळीराजा पुन्हा एकदा हवालदिल झाला आहे. परतीच्या पावसाने भातासह इतर सर्वच पिकांना मोठा दणका दिला आहे.
भातपीक पावसामुळे आडवे पडल्याने त्यावर पाणी साचून मोठे नुकसान झाले आहे. मागील आठवड्यात सुरू झालेल्या परतीच्या पावसाने बेळगाव तालुक्यात भात पिकाचे सर्वाधिक नुकसान केले असून भातपीक ऐन कापणीला आले असताना पावसाने केलेल्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यावर्षी आधीच करपा रोगाने शेतकरी हवालदिल झाला असतानाच आता परतीच्या पावसानेही उरलेले पीकही खराब झाल्याने आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे.
वास्तविक, ऑक्टोबर महिन्यापासून पावसाचे प्रमाण कमी होते. परंतु यावर्षी मात्र पावसाने ऑक्टोबर महिन्यात देखील हजेरी लावली असून मागील आठ दिवसांपासून बेळगाव शहरासह तालुक्यात पावसाची संततधार सुरूच आहे.
परतीच्या पावसाने जोरदार धडक दिल्याने सखल भागात पुन्हा पाणी साचू लागले आहे. जोरदार पावसामुळे पावसाचा अंदाज न आल्याने छत्री, रेनकोट न घेता घराबाहेर पडलेल्यांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली.
बराच वेळ थांबूनदेखील पावसाचा जोर कमी होत नसल्याने अखेर भिजत घर गाठण्याची वेळ नागरिकांवर आली. पावसामुळे सायंकाळनंतर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी, भाजीविक्रेते, रस्त्यावरील विक्रेत्यांची धावपळ झाली मात्र सायंकाळनंतर बाजारपेठेत मात्र शुकशुकाट दिसून येत आहे.