बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील टिळकवाडी येथील पहिल्या रेल्वेगेटनजीक वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवत असून नुकतीच याठिकाणी खासदार जगदीश शेट्टर यांनी भेट देऊन पाहणी केली. मात्र टिळकवाडी पहिल्या रेल्वेगेटसह शहरातील ठिकठिकाणी असणाऱ्या उड्डाणपुलाची अवस्था पाहता आता ओव्हरब्रीज नव्हे तर अंडरपास करण्याची गरज आहे, असे मत नागरिक व्यक्त करत आहेत.
बेळगाव शहराच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी बेळगावमध्ये तीन ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत. मात्र टिळकवाडी भागातील वाहतूक कोंडीची समस्या जैसे थेच असल्याचे निदर्शनात येत आहे. टिळकवाडी पहिल्या रेल्वे गेटनजीक सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते.
याठिकाणी अनेक शाळा, महाविद्यालये यासह विविध ठिकाणी कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांची मोठया प्रमाणात वर्दळ असते. येथील समस्या सोडविण्यासाठी नागरिकांनी अनेकवेळा निवेदनाचा पाऊस पाडला. मात्र टिळकवाडी पहिल्या रेल्वेगेटनजीकची समस्या हि जैसे थे अशाच परिस्थितीत आहे.
अशातच भर म्हणून पहिल्या रेल्वेगेटजवळ असलेल्या दुभाजकाला बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे काँग्रेस रोड, महात्मा गांधी रोड, महषी रोड, नानावाडी, चौगुलेवाडी, गोडसेवाडी, द्वारकानगर, भवानीनगर, मंडोळी, हंगरगा या परिसरातील नागरिकांना मोठी समस्या निर्माण झाली आहे. एकीकडे रेल्वेगेट दुसरीकडे बॅरिकेड्स यामुळे या भागात संचार करणाऱ्या नागरिकांना नाहक मनस्ताप सोसावा लागत आहे.
रेल्वे जात असताना गेट पडल्यानंतर तब्बल २० मिनिटे नागरिकांना ताटकळत थांबण्याची वेळ येत आहे. यामुळे जर आपत्कालीन परिस्थिती ओढवली तर अनुचित प्रकार घडण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे आता खासदार जगदीश शेट्टर यांनी बांधलेल्या पुलाची पाहणी करून त्याची डागडुजी करा यासह अंडरपासचे कामकाज का हाती घेऊ नये? अंडरपास निर्माण करण्यासाठी अनेक दिवसांपासून नागरिकांची मागणी पुढे येत आहे. तर मग खासदारांनी अंडरपास निर्माण करण्याबाबत विचार का करू नये? असा प्रश्न येथील नागरीकातून उपस्थित होत आहे.