बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील गोंधळी गल्ली येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या गर्भवती महिलेचा रुग्णालयाच्या दुर्लक्षपणामुळे आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी खडेबाजार पोलीस स्थानकासमोर आक्रोश व्यक्त केला.
आरती चव्हाण (वय ३२, रा. कंग्राळी) असे मृत महिलेचे नाव असून मंगळवारी सकाळी सदर महिलेला पोट दुखी जाणवत असल्याने उपचारासाठी गोंधळी गल्लीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र या रुग्णालयात महिलेच्या तब्येतीबाबत दुर्लक्ष करण्यात आले.
सदर महिलेवर दुपारच्या सुमारास शस्त्रक्रियाही करण्यात आली. मात्र दुपारनानंतर पुन्हा पोटदुखी वाढली. यावेळी रुग्णालयातील परिचारिकांनी आपल्या पातळीवर उपचार केले. महिलेची तब्येत नियंत्रणाबाहेर जात असल्याचे जाणवताच डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. मात्र यावेळी महिलेची प्रकृती अत्यंत खालावल्याने तिला के एल इ रुग्णालयात हलविण्याची तयारी सुरु झाली.
यादरम्यान रुग्णालयात नेत असतानाच महिलेचा मृत्यू झाल्याने यासाठी रुग्णालयाचा दुर्लक्षितपणा आणि बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचा आरोप मृत महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे.
डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे सदर महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करत मृत महिलेच्या कुटुंबीयांनी खडेबाजार पोलीस स्थानकासमोर ठिय्या मांडला. यावेळी मृत महिलेच्या कुटुंबीयांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटणारा होता.