बेळगाव लाईव्ह:धर्मसंस्कारांच्या कार्यासाठीची श्री दुर्गामाता दौड कुठे भर पावसात, तर कुठे घोषणाबाजी करत निघाल्याचे वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असताना दौडमध्ये सहभागी 500 जणांना झाडाची रोपे देऊन पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्याचा आदर्शवत उपक्रम आज हलगा येथील राष्ट्रप्रेमी युवक मंडळाच्यावतीने राबविण्यात आला.
नवी गल्ली, हलगा येथील राष्ट्रप्रेमी युवक मंडळाने श्री दुर्गामाता दौडचे स्वागत करण्यासाठी आज गुरुवारी सकाळी पर्यावरण व जनजागृतीचा देखावा सादर केला होता.
तसेच मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्यावतीने गावातील चैतन्यमय श्री दुर्गामाता दौडमध्ये सहभागी झालेल्या युवक -युवतींमध्ये झाडांच्या 500 रोपांचे वाटप करून त्यांचे स्वागत करण्यात आले.
झाडे जगवा झाडे वाचवा झाडे जगवा लावा.. हा संदेश देताना निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन यावेळी राष्ट्रप्रेमी युवक मंडळाकडून करण्यात आले.