बेळगाव लाईव्ह -” पायोनियर अर्बन बँकेने अनेक व्यावसायिकांना अर्थसाहाय्य करून त्यांच्या उद्योग व्यवसाय वाढीसाठी कार्य केलेले आहेच ,पण त्याचबरोबर महिला सबलीकरणासाठी मायक्रो फायनान्स सारख्या योजनेची सुरुवात करून 2000 हून अधिक महिलांना स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी जे कार्य केले आहे ते कौतुकास्पद आहे” असे विचार कर्नाटकच्या महिला व बालकल्याण मंत्री सौ लक्ष्मीताई हेंबाळकर यांनी बोलताना व्यक्त केले.
पायोनियर अर्बन बँकेच्या पाचव्या आणि ग्रामीण भागातील पहिल्या शाखेचा शुभारंभ रविवारी समारंभपूर्वक हिंडलगा येथे करण्यात आला. त्यावेळी सौ लक्ष्मीताई हेबाळकर या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. हिंडलगाच्या शाखेचे उद्घाटन फीत सोडून त्यांनी केले.
त्यापुढे म्हणाल्या की, पायोनियर बँकेने लोकांचा विश्वास संपादन केला आहे आणि माझ्या भागात ते आता आले आहेत. या भागातील जनता त्यांना निश्चित पाठिंबा देईल. आणि या भागातील जनतेच्या विकासासाठी या बँकेचा निश्चित उपयोग होईल. माझी स्वतःची सहकारी बँक सौंदत्ती मध्ये असून तिच्या नऊ शाखा कार्यरत आहेत “अशी माहितीही त्यांनी यावेळी बोलताना दिली .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन प्रदीप अष्टेकर हे होते तर पाहुणे म्हणून माजी तालुका पंचायत सदस्य एस एल चौगुले व ईतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
संस्थेचे व्हाईस चेअरमन रणजीत चव्हाण पाटील यांच्या प्रास्ताविकानंतर चेअरमन प्रदीप अष्टेकर यांनी सर्वांचे स्वागत केले .”बँकेने गेल्या काही वर्षात उल्लेखनीय प्रगती केली आहे. केवळ काही वर्षात ठेवी 84 कोटी वरून 156 कोटी पर्यंत आणल्या आहेत. जनतेच्या असलेल्या विश्वासामुळेच ही प्रगती करता येणे शक्य झाले आहे. बँक हा माझा श्वास आहे आणि याही पुढे बँक प्रगतीपथावर राहण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. माझ्या सहकाऱ्यानी आणि कर्मचारी वर्गाने केलेल्या नीटनेटक्या कामामुळेच ही प्रगती शक्य झाली आहे”असेही ते म्हणाले.
माजी आमदार आणि पायोनियर बँकेचे माजी चेअरमन श्री रमेश कुडची यांनी दीप प्रज्वलन केले. “प्रदीप अष्टेकर आणि त्यांच्या टीमने विविध योजना आखून बँकेची प्रगती साधली आहे. खास करून महिलांना स्वावलंबी करण्यासाठी त्यांनी ज्या योजना आखल्या आहेत त्या कौतुकास्पद आहेत. या बँकेत सर्व जाती धर्माचे लोकसभासद असल्याने येथे जात पात धर्म याचा विचार न करता सर्वांना सहकार्य केले जाते. त्यामुळे सर्व जाती धर्माचे लोक या बँकेचे सभासद होऊ शकले. नजीकच्या काळात बँक दोनशेहून अधिक कोटीच्या ठेवीचा टप्पा निश्चितपणे पार करू शकेल याचा मला विश्वास वाटतो”असेही ते म्हणाले.
छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन माजी बुडा चेअरमन श्री युवराज कदम यांच्या हस्ते करण्यात आले. तर लक्ष्मी फोटो पूजन क्लास वन गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर एन एस चौगुले यांनी केले. स्ट्रॉंग रूमचे व संगणकाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते शिवाजी अतिवाडकर यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर एस एल चौगुले, बँकेच्या सीई ओ अनिता मूल्या आणि व्यवस्थापन मंडळाचे चेअरमन अनंत लाड आदी उपस्थित होते.
कार्यक्रमास हिंडलगा, आंबेवाडी, सुळगा, बेळगुंदी, उचगाव व तूरमुरी येथील ग्रामपंचायतीं चे अध्यक्ष व उपाध्यक्ष,तसेच सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी त्या सर्वांचा तसेच जागा मालक प्रकाश बेळगुंदकर यांचा शाल व श्रीफळ अर्पण करून बँकेच्या संचालकांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी काही संस्थांनी मोठ्या रकमेच्या ठेवी आज बँकेत जमा केल्या. त्यांचाही चेअरमन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत लाड यांनी तर आभार प्रदर्शन संचालक गजानन पाटील यांनी केले. यावेळी सह्याद्री सोसायटीचे चेअरमन एन बी खांडेकर, रघुनाथ बांडगी, पीपी बेळगावकर, मराठा बँकेचे चेअरमन दिगंबर पवार, माजी महापौर विजय मोरे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब चोपडे, नागनाथ जाधव, डीव्ही पाटील, शिवाजी राक्षे, दिलीप सोहनी, युवराज हुलजी, विजय पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संचालक सुवर्णा शहापूरकर, शिवराज पाटील ,रवी दोड्डणावर ,सुहास तराळ ,यल्लाप्पा बेळगावकर, गजानन ठोकणेकर ,विद्याधर कुरणे, मारुती शिगीहळळी, बसवराज इटी, रोहन चौगुले, नितीन हिरेमठ, ज्ञानेश्वर सायनेकर, कमलेश मायानाचे आदीही उपस्थित होते.