बेळगाव लाईव्ह :मण्णूर (ता. जि. बेळगाव) येथील होतकरू धावपटू तुषार वसंत भेकणे याने पाटणा (बिहार) येथे नुकत्याच संपन्न झालेल्या 4 थ्या भारतीय खुल्या 23 वर्षाखालील अथलेटिक्स स्पर्धा -2024 मध्ये चमकदार कामगिरी नोंदवताना 800 मी. धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक पटकावले आहे.
पाटणा (बिहार) येथील पाटलीपुत्र स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे गेल्या 28 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत पार पडलेल्या 4 थ्या भारतीय खुल्या 23 वर्षाखालील अथलेटिक्स स्पर्धेमध्ये भरतेश वाणिज्य महाविद्यालयाचा विद्यार्थी असलेल्या मण्णूर येथील तुषार भेकणे याने कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व केले.
सदर राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेतील पुरुषांच्या 800 मी. धावण्याच्या शर्यतीत 1:51.97 इतके वेळ नोंदवत तुषार याने द्वितीय क्रमांकासह रौप्य पदक मिळविले. यापूर्वी म्हैसूर येथे झालेल्या खुल्या 23 वर्षाखालील अथलेटिक्स स्पर्धेमध्ये गेल्या 14 सप्टेंबर रोजी 800 मी. शर्यतीमध्ये त्याने सुवर्णपदक पटकावण्याबरोबरच स्पर्धा विक्रम प्रस्थापित केला आहे.
सेंट पाॅल हायस्कूलचा माजी विद्यार्थी असणारा तुषार मण्णूर येथील प्रतिष्ठित नागरिक व मार्कंडेय को -ऑप. सोसायटीचे व्यवस्थापक वसंत भेकणे यांचा चिरंजीव आहे. धावपटू तुषार भेकणे हा सध्या विद्यानगर बेंगलोर येथील खेलो इंडिया अकॅडमीमध्ये असून तो तेथे गेल्या दीड वर्षापासून ॲथलेटिक्स प्रशिक्षण घेत आहे.
त्याला आई-वडिलांचे प्रोत्साहन तसेच भरतेश महाविद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रदीप जुवेकर, शिरीष सांबरेकर आणि खेलो इंडिया अकॅडमी बेंगलोरचे प्रशिक्षक वसंत सर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. उपरोक्त यशाबद्दल तुषार याचे गावासह क्रीडा क्षेत्रात अभिनंदन होत आहे.