Friday, January 10, 2025

/

कांद्याचा भाव घसरल्याने शेतकऱ्यांचे गेट बंद आंदोलन

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव एपीएमसी मार्केट यार्डमध्ये आज सोमवारी कांद्याचा भाव अचानक घसरल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी गेटबंद आंदोलन करून निषेध व्यक्त केला. सोमवारी विविध भागातून कांदा उत्पादक शेतकरी एपीएमसीमध्ये दाखल झाले होते.

मात्र स्थानिक व्यापाऱ्यांनी कांद्याचे दर अत्यंत कमी ठरवून खरेदी करण्यासाठी नकार दिला. बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत नेहमीप्रमाणे परगावाहून कांद्याची आवक झाली होती. बागलकोट, लोकापुर, विजयपूर, हुबळी-धारवाड अशा विविध ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाली मात्र कांद्याचा दर्जा योग्य नसल्याचे कारण देत स्थानिक व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी करण्यास नकार दिला. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी गेट बंद आंदोलन करून आपला संताप व्यक्त केला.

कांदा उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी कर्ज काढले आहे. शिवाय विविध ठिकाणाहून कांदा एपीएमसीमध्ये दाखल करण्यासाठी हमाली, मजुरी यासह विविध खर्च उचलला आहे. आपण पिकविलेल्या उत्पादनाला योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

पिकविलेले पीक उत्पादन ठिकाणावरून बाजारपेठेत दाखल करण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक कष्ट सोसावे लागतात. मात्र गुंतवणूक केलेली रक्कमदेखील शेतकऱ्यांना न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

यादरम्यान एपीएमसी अधिकारी, शेतकरी आणि दलालांची बैठक पार पडली. यावेळी प्रसारमाध्यमांना माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले, कि कांद्याचे दर पडल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. कांद्याच्या दर्जावरून त्याची किंमत ठरविली जाते.

बाजारपेठेत कच्चा कांदा उपलब्ध झाल्याने दरात तफावत निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. याबाबत विचारविनिमय करण्यासाठी वरिष्ठांसमवेत शेतकरी आणि दलालांचीही बैठक घेऊन यावर तोडगा काढला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. एपीएमसी शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत असून या समस्येवर देखील तोडगा काढला जाईल, असे ते म्हणाले.

एपीएमसी मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांकडून कांद्याची उचल न झाल्यामुळे एपीएमसी मार्गावर दुतर्फा लांबच्या लांब रांगेमध्ये कांद्याचे ट्रक थांबून राहिले होते. शिवाय गेट बंद आंदोलन छेडल्याने इतर पीक घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांनाही एपीएमसी बाहेरच ताटकळत उभे राहावे लागले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.