बेळगाव लाईव्ह:जिजाऊंनी बालशिवाजींना जे विचारांचे बाळकडू दिले ते आजच्या मातांनी आपल्या बालकांना देणे ही काळाची गरज आहे. जिजाऊंनी शिवरायांना अन्याय, अत्याचाराविरुद्ध लढण्याची शिकवण दिली. अनेकांनी शिवरायांचा इतिहास लिहिला, तथापि बालपणापासून त्यांची जडणघडण कशी झाली हा इतिहास आजच्या पिढीला समजणे गरजेचे आहे, असे उद्गार शिवव्याख्याते हिरामणी लक्ष्मण मुचंडीकर यांनी काढले.
राकसकोप (ता. जि. बेळगाव) येथील नोकरी -व्यवसायानिमित्त बाहेरगावी स्थायिक झालेले युवक आणि गावातील युवक यांच्यामार्फत खास दसरोत्सवानिमित्त आयोजित ‘एक दिवस गावासाठी’ या आगळ्या कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात शिवव्याख्याते मुचंडीकर प्रमुख वक्ते या नात्याने बोलत होते. अध्यक्षस्थानी आयोजन समितीचे अध्यक्ष रवळनाथ नारायण मोरे हे होते. प्रारंभी ग्रामस्थ पंच कमिटीच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यानंतर परशराम किणयेकर यांनी सर्वांच्यावतीने गावातील गतवर्षी मयत झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली.
प्राचार्य डॉ. अंकुश लक्ष्मण बेळवटकर यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय शिवसंत संजय रूक्मांना मोरे यांनी करून दिला. यावेळी इयत्ता सातवी आणि दहावी मध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या अनुक्रमे समीक्षा संजय बेळगावकर, यश नामदेव सुकये, सुहानी अमोल मोरे व अर्पिता लक्ष्मण गाडेकर या विद्यार्थी विद्यार्थिनींचा सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले जवान जयंत विठ्ठल सुकये यांनाही गौरवण्यात आले.
कार्यक्रमात मराठी प्राथमिक शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी लेझीम खेळाचे सुरेख प्रात्यक्षिक सादर केल्याबद्दल शिक्षक प्रवीण यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पुढील वर्षाच्या ‘एक दिवस गावासाठी’ कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून किसन रामू सुकये यांची निवड झाल्याचे भावकू मारुती मासेकर यांनी जाहीर केले, त्याला सातेरी आप्पाजी कंग्राळकर यांनी अनुमोदन दिले.
‘एक दिवस गावासाठी’ या कार्यक्रमांतर्गत गावातील हौशी कलाकारांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्याचप्रमाणे कवी रवींद्र पाटील व तानाजी पाटील यांनी सुमधुर भावगीते व भक्तीगीते सादर केली. श्री पंचरासी भजनी मंडळाने भारुड सादर करून ग्रामस्थांची वाहव्वा मिळवली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक मोहन कल्लोजी पाटील व निवृत्त सुभेदार केदारी रामू मोटर यांनी केले.
शेवटी ह.भ.प. गौरव दत्तू सुतार यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शंकर बाबुराव कंग्राळकर आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमास राकसकोप गावातील तसेच पंचक्रोशीतील अबालवृद्ध बहुसंख्येने उपस्थित होते