बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील वडगाव भागात असणाऱ्या तीन तलावांमध्ये गेल्या तीन महिन्यात तिघांचे बळी गेले असून यासाठी कंत्राटदाराचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या तलावाने दोन लहान मुलांसह एका ४० वर्षीय व्यक्तीचा बळी घेतला असून याला सदर कंत्राटदार जबाबदार असल्याचा आरोप नागरीकातून पुढे आला आहे. या पार्श्वभूमीवर आज समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांच्यासह नागरिकांनी अधिकाऱ्यांचे घर गाठून सदर समस्येबाबत चर्चा करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यानंतर तातडीने या तलावाचे कामकाज सुरु करण्यात आले आहे.
वडगाव मध्ये मंगाई नगर येथे २ तलाव तर जुने बेळगावमधील कलमेश्वर मंदिरानजीक एक तलाव आहे. या तलावाला संरक्षक भिंती नसल्याने अनेकांचा या तलावाने बळी घेतला आहे. मागील आठवड्यात जुने बेळगावमधील लखन खन्नूकर या १३ वर्षीय बालकाचाही तलावात पडून मृत्यू झाला.
या घटनेनंतर रमाकांत कोंडुसकर यांनी तालावधी पाहणी केली. नागरिक देखील आक्रमक झाले. यानंतर सोमवारी रमाकांत कोंडुस्कर यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी अधिकाऱ्यांचे घर गाठत तलावाच्या दुरुस्तीसंदर्भात जाब विचारला.
सदर तलावाच्या दुरुस्तीकरिता एकाचं कंत्राटदाराला कंत्राट देण्यात आल्याचे यावेळी समोर आले असून सदर कंत्राटदाराने काम सुरु करून पुन्हा बंद केल्याचे समजते तिन्ही तलावांचे दुरुस्तीकरणाचे कंत्राट घेतलेल्या कंत्राटदाराने काम बंद केल्याने हि परिस्थिती ओढवली असून तातडीने या तलावांची दुरुस्ती हाती घ्यावी, असा आग्रह अधिकाऱ्यांना करण्यात आला.
यानंतर आता जनतेच्या संरक्षणासाठी तलावांना संरक्षक भिंत घालण्याचा निर्णय घेण्यात आला असून आज तातडीने अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या कामकाजाला सुरुवात करण्यात आली आहे. शिवाय बेजबाबदार कंत्राटदारावर तक्रार देखील नोंदविण्यात येणार आहे, अशी माहिती रमाकांत कोंडुसकर यांनी दिली.