बेळगाव लाईव्ह : हिवाळ्याची सुरुवात झाल्यानंतरही पावसाने अद्याप विश्रांती घेतली नसून परतीच्या पावसाने सर्वत्रच धुमाकूळ घातला आहे. मध्यरात्रीपासून सुरु होणारा पाऊस सकाळी जोरदार बरसत असून दिवसभर ढगाळ वातावरण आणि सायंकाळी थंड वारा यामुळे आरोग्याच्या तक्रारीही वाढू लागल्या असून सर्दी – पडश्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. रुग्णालयांमध्ये सर्दी – पडसे – ताप अशी लक्षणे दिसणारे रुग्ण वाढले असून पावसामुळे सर्वत्रच दैना उडाल्याचे चित्र आहे.
परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने शहरातील व्यावसायिकांसह नागरिकांची तारांबळ उडाली. येत्या आठ दिवसात दिवाळी सण साजरा केला जाणार असून या सणाच्या तयारीसाठी नागरिक बाजारात गर्दी करत आहेत.
मागील आठ दिवसांपासून परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. दररोज दुपारनंतर जोरदार पाऊस होत असल्याने खरेदीलाही फटका बसत आहे. वेळीअवेळी पडणाऱ्या पावसामुळे प्रत्येकाचीच तारांबळ उडत असून शहरातील विविध ठिकाणी गटारी तुंबून रस्त्यावर पाणी वाहून अनेक आस्थापनांमध्ये शिरत असल्याचे चित्र आहे.
सध्या प्रत्येक गल्लोगल्ली दिवाळीनिमित्त विविध साहित्याचे स्टॉल्स मांडण्यात आले असून अचानक येणाऱ्या पावसामुळे सर्वांच्याच आनंदावर विरझन पडत आहे. शिवाय साहित्य भिजल्यामुळे व्यावसायिकांचेही नुकसान होत आहे.
मंगळवारी दिवसभरात विजांच्या कडकडाटात शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. पावसामुळे रस्त्यावरून पाणी वाहू लागल्याने सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. सध्या ग्रामीण भागात शेतशिवारामध्ये शेतकर्यांची लगबग सुरू आहे. बेळगावमध्ये मोठ्या प्रमाणात भातपीक घेतले जाते. यावर्षी मुबलक पाऊस झाल्यामुळे भातपीक जोमाने आले आहे. माळरानावरील भातपीक कापणीसाठी आले आहे.
परंतु गेला आठवडाभर पडणाऱ्या दमदार पावसामुळे शेतवडीत पाणीच पाणी झाले आहे. वारा पावसामुळे उभे असलेले भातपीक आडवे झाले असून भाताची लोंबे पाण्याखाली गेली आहेत. यामुळे भात पिकाचे नुकसान झाले आहे. यामुळे यंदा जनावरांच्या चाऱ्यांचाही प्रश्न निर्माण झाला आहे. सुरुवातीपासूनच बऱ्यापैकी पाऊस झाल्याने भात जोमाने आले होते.
उत्पादनात वाढ होणार, शेतकरी सुखी होणार असे सर्वांनाच वाटत होते. नवरात्रीनंतर कमी पाण्याच्या जमिनीतील भात पिकाची कापणी करण्यात येते. परंतु गेल्या आठवड्याभरापासून भात कापणीच्या कामात व्यत्यय निर्माण झाला आहे.
रोज पहाटेपासून सायंकाळपर्यंत आकाशात ढग दाटून येत आहे. केव्हा पाऊस पडेल याची शाश्वती नसते. एकदा पडलेला पाऊस मोठ्या प्रमाणात एकाच जागी पडत असल्याने जनतेत चिंता निर्माण झाली आहे.