बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहरातील टिळकवाडी येथील तिसऱ्या रेल्वे गेट उड्डाण पुलाच्या रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस धोकादायक बनत चालली आहे. अपघाताला निमंत्रण देणारे हे रस्ते मृत्यूचा सापळा बनण्यापूर्वी त्यांची तात्काळ योग्य शाश्वत दुरुस्ती करण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी नुकतीच शहरातील उड्डाणपूलांसंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सूचना केल्या असल्या तरी त्या सूचनानुसार तातडीने अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.
विशेष करून तिसऱ्या रेल्वे गेट येथील उड्डाण पुलाच्या रस्त्यांची खड्डे पडण्याबरोबरच डांबरीकरण उखडल्यामुळे संपूर्ण वाताहात झाली आहे. निर्मिती झाल्यापासून या उड्डाणपूलाच्या बाबतीतील तक्रारी थांबलेल्या नाहीत.
अधिकारी, कंत्राटदार आणि तत्कालीन लोकप्रतिनिधी यांनी केलेला भ्रष्टाचार फलस्वरूप निकृष्ट उड्डाणपूल म्हणजे तिसऱ्या रेल्वे गेट येथील उड्डाणपूल असा जाहीर आरोप केला जात असतानाही याची कोणीच दखल घेत नाही हे सर्वसामान्य बेळगावकरांचे दुर्दैव आहे.
विद्यमान जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकार पदाची सूत्रे हाती घेताच या पुलाला भेट देऊन रस्ता दुरुस्तीचे आदेश दिले. त्यानुसार रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये काँक्रीट टाकून त्वरित दुरुस्ती करण्यात आली पण ती देखील ‘येरे माझ्या मागल्या’ याप्रमाणे निकृष्ट दर्जाची केली गेली.
परिणामी सध्या या उड्डाण पुलावरील रस्ते अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत. वाहन चालक विशेष करून दुचाकी वाहन चालक त्यांचे दैव बलवत्तर असेल तरच या पुलावरून ये -जा करू शकतात अशी सध्याची परिस्थिती आहे. एकंदर कोट्यावधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या उड्डाण पुलाच्या बाबतीत होत असलेल्या दुर्लक्षामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.