बेळगाव लाईव्ह : बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी आज रामदुर्ग तालुक्यातील ऐतिहासिक शबरीकोळ्ळ येथील शबरीदेवी देवस्थानात जाऊन दर्शन घेतले व भाविकांच्या हितासाठी करावयाच्या विविध विकासकामे व मूलभूत सुविधांची माहिती स्थानिकांकडून घेतली.
येथे येणाऱ्या हजारो भाविकांच्या हितासाठी हे पर्यटन स्थळ बनवून आवश्यक त्या सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत येत्या काळात केंद्रीय पर्यटन मंत्र्यांशी निश्चितपणे चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
रामायण काळात प्रभू श्री राम चंद्रांना शबरीने दिलेल्या बोरांचा प्रसंग या ऐतिहासिक स्थळाशी निगडित आहे. हे पवित्र स्थान असून याठिकाणी बारमाही पाणी वाहते. यामुळे हे ठिकाण विकसित करण्यासाठी पर्यटन विभागाशी चर्चा करण्याचे आश्वासन खासदारांनी दिले आहे.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष डॉ. के. पाटील नेते मल्लण्णा यादव, राजेश बिळगी, संगणागौडर, पाटील, निंगाप्पा मेलिकेरी, महादेवप्पा मडकट्टी, श्रीशैल मल्लिकेरी, निंगाप्पा मुल्लूर, पीएलडी बँकेचे अध्यक्ष नारायण हुलीगेर व ग्रामस्थ उपस्थित होते.