बेळगाव लाईव्ह: दररोज सकाळी बेंगळुरू ते बेळगाव दरम्यान सुरू असणारी विमान सेवा बंद करू नका, अशी मागणी खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री किंजरापू राममोहन नायडू यांच्याकडे केली आहे.
खासदार जारकीहोळी यांनी एका प्रसिद्धी पत्रकारद्वारे ही माहिती दिली आहे. बेळगाव ते बेंगळुरू दरम्यानची दररोज सकाळची इंडिगो 6ई 7285 -7286 ही विमानसेवा 27 पासून बंद होणार असल्याची माहिती मिळताच प्रवाशा मधून नाराजी व्यक्त केली जात असल्यामुळे खासदारांनी हे पाऊल उचलले आहे.
बेळगावहून बेंगलोरला तात्काळ जाण्यासाठी, एका दिवसातच काम आटोपून परत येण्यासाठी इंडिगो विमान सेवेचा वापर होत होता. मात्र अचानक इंडिगो एअरलाइन्सने सदर विमानसेवा रद्द करण्याचे जाहीर केल्यानंतर प्रवासी वर्गातून नाराजी पसरली आहे.
सदर विमानसेवा बंद झाल्याने या भागातील व्यापार, उद्योग क्षेत्र आणि राजकीय क्षेत्रावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ही विमानसेवा बंद केली जाऊ नये अशी मागणी खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी विमान उड्डाणमंत्र्यांकडे केली आहे.
दररोज सकाळी बेळगावहून बेंगळूरूला जाऊन तिथून पुढे देश -विदेशात जाण्यासाठी इंडिगो 6ई 7285 -7286 या विमान सेवेचा उपयोग होत होता. इतकेच काय तर गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेल्या या विमानसेवेला 85 टक्क्याहून अधिक चांगला प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय बेळगावात दरवर्षी होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात येणारे आमदार, खासदार, मंत्री वरिष्ठ अधिकारी, उद्योजक यांना देखील या विमानसेवेमुळे बेळगाव गाठणे अनुकूल होत होते.
ही विमान सेवा व्यापारी उद्योजक आणि बेळगाव ला येणारे संरक्षण खात्याचे अधिकारी विद्यार्थी यांना देखील अनुकूल होती. यासाठी विमान उड्डाण मंत्र्यांनी याकडे लक्ष देऊन सदर विमानसेवा पूर्ववत कायम सुरू ठेवावी, अशी मागणी खासदार जारकीहोळी यांनी केली आहे.