बेळगाव लाईव्ह :वारंवार अर्ज विनंती करून देखील हिंडलगा ते बाची गावापर्यंतच्या अत्यंत खराब होऊन धोकादायक बनलेल्या बेळगाव -वेंगुर्ला रस्त्याच्या दुरुस्तीकडे साफ दुर्लक्ष केले जात असल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडताना आज सकाळी या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण केले.
प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी केलेल्या या ‘गांधीगिरी’बद्दल खराब रस्त्यामुळे त्रस्त झालेल्या वाहनचालकात समाधान व्यक्त होत होते.
सावंतवाडी मार्गे बेळगाव ते वेंगुर्ला या रस्त्याच्या देखभालीकडे गेल्या अनेक वर्षापासून सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यापासून हिंडलगा ते बाचीपर्यंतच्या या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. डांबरीकरण उखण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे काही ठिकाणी या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.
या पद्धतीने सदर रस्ता अपघात प्रमाण बनला असल्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्ती संदर्भात अलीकडे वारंवार आंदोलन करून निवेदन सादर केली जात आहेत. मात्र आजतागायत जनतेच्या मागणीकडे कानाडोळा केला जात आहे. या पद्धतीने रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करून लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार केला जात असल्यामुळे संतप्त झालेल्या या मार्गावरील विविध गावातील नागरिकांनी आज सोमवारी सकाळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली या रस्त्यावर आंदोलन छेडले.
मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांनी सदर रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून युद्धपातळीवर रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली. या पद्धतीने आंदोलनकर्त्यांकडून रस्त्यावर वृक्षारोपण करण्यात आल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला असला तरी खराब रस्त्यामुळे त्रस्त झालेल्या वाहन चालकात समाधान व्यक्त होत होते. तसेच आता तरी प्रशासनाने या रस्त्याकडे गांभीर्याने पाहून त्याची त्वरेने दुरुस्ती करावी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात होती.
आंदोलनाच्या ठिकाणी बेळगाव लाईव्हशी बोलताना महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवानेते आर. एम. चौगुले म्हणाले की, बाची, चिरमुरी, उचगाव क्रॉस, सुळगा आणि त्यानंतर हिंडलगा गणपती दरम्यानच्या अत्यंत खराब झालेल्या बेळगाव -वेंगुर्ला रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये आज आम्ही वृक्षारोपण करून आमचा निषेध नोंदवला आहे. कारण या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी गेल्या महिन्याभरापासून आमच्या भागातील बरेच लोकप्रतिनिधी, ग्रा.पं. सदस्यांनी विविध मार्गाने आंदोलन करून पाहिली, मात्र प्रशासनाकडून या रस्त्याची दुरुस्ती करण्याकडे डोळेझाक केली जात आहे. याकरिता प्रशासनाला जागे करण्यासाठी आज आम्ही रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्याचे हे आंदोलन केले आहे. रायचूरपासून बाचीपर्यंतचा हा रस्ता राज्य महामार्ग असला तरी त्याच्या विकासाचे काम बेळगावच्या म. गांधी चौकापर्यंत पूर्ण करण्यात आले आहे. मात्र त्यापुढील बाचीपर्यंतच्या रस्त्याचा गेले कित्येक वर्षापासून व्यवस्थित विकासाच करण्यात आलेला नाही. या रस्त्याकडे प्रशासन कायम दुर्लक्ष करत आले आहे.
सध्या दुर्दशा झालेल्या या रस्त्यावरील कांही खड्डे अपघाताला निमंत्रण देणारे जीवघेणे ठरत आहेत. गेल्या दोन-तीन महिन्यात या रस्त्यावर असंख्य अपघात झाले असून त्यामध्ये बऱ्याच जणांना गंभीर इजा झाल्या आहेत अशी माहिती देऊन प्रशासनाने जनतेच्या सहनशक्तीचा अंत न पाहता सदर रस्त्याची युद्ध पातळीवर दुरुस्ती करून तो सुरक्षित करावा, अन्यथा तीव्र आंदोलन हाती घेण्यात येईल असा इशारा समिती नेते आर. एम. चौगुले यांनी दिला.
युवा नेते डी. बी. पाटील यांनी यावेळी बोलताना बेळगाव ते सावंतवाडीपर्यंतचा वेंगुर्ला रस्ता अर्थात राज्य महामार्गाच्या दुर्दशेबद्दल माहिती दिली. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे त्याची चाळण झाली आहे. मागील आठवड्यात सदर रस्त्याच्या दुरुस्ती संदर्भात आम्ही निवेदनही दिले होते. त्याचप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन रस्त्याची पाहणी केली होती.
मात्र त्यानंतर कोणतीच कार्यवाही झाली नसल्यामुळे आज आम्ही हे आंदोलन छेडले असून येत्या 8 दिवसात किमान या रस्त्यावरील खड्डे बुजून डागडुजी केली जावी. अन्यथा त्याच्या पुढच्या आठवड्यात या ठिकाणी मोठे रस्ता रोको आंदोलन हाती घेतले जाईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.