बेळगाव लाईव्ह : 1956 मध्ये अन्यायाने सीमाभाग कर्नाटकात डांबण्यात आला. तेव्हापासून 1 नोव्हेंबर काळा दिन म्हणून गांभीर्याने पाळला जातो. दरवर्षी प्रशासनाकडून काळा दिन आचरणात आणण्यासाठी आडकाठी करून दडपशाहीचे धोरण अवलंबिले जाते. मात्र दरवर्षीप्रमाणेच यंदाही निषेध फेरी आणि काळा दिन यशस्वी करण्यासाठी बेळगावसह संपूर्ण सीमाभागातील मराठी भाषिकांनी प्रचंड संख्येने निषेध फेरीत सहभागी व्हा, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समिती बैठकीत करण्यात आले.
रामलिंग खिंड गल्ली येथील रंगुबाई भोसले पॅलेस मध्ये आयोजित शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत 1 नोव्हेंबर रोजी निघणाऱ्या निषेध फेरीत बहुसंख्येने सहभागी होऊन काळा दिन गांभीर्याने पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर बोलताना म्हणाले, आज बोलाविण्यात आलेल्या बैठकीत बहुसंख्य कार्यकर्त्यांनी मुक्तपणे आपली मते मांडली. यामध्ये प्रामुख्याने काळा दिन दरवर्षीनुसार जिद्दीने आचरणात आणण्यासंदर्भात निर्धार करण्यात आला आहे. आजवर पाळण्यात आलेला काळा दिन यंदाही अशाच पद्धतीने पाळून केंद्रसरकारविरोधात आपला निषेध नोंदविण्यासाठी बेळगावसह संपूर्ण सीमाभागातील मराठी भाषिकांनी प्रचंड संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बोलताना शहर म. ए. समिती कार्याध्यक्ष रणजित चव्हाण पाटील म्हणाले, यंदाच्या १ नोव्हेंबर रोजी दरवर्षीनुसार काळा दिन गांभीर्याने पाळून प्रत्येकाने निषेध फेरीत मोठ्या संख्येने सहभागी व्हायचे आहे. यासंदर्भात आज बोलाविण्यात आलेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी विचार मांडले असून याचदिवशी दिवाळी सण असल्याने प्रत्येकाने घरातील कार्यक्रम आटोपून सकाळी निषेध फेरीत सहभागी व्हायचे आहे.
कोणत्याही परिस्थिती हि फेरी निघणारच असून प्रत्येकाच्या सहभागाने फेरी यशस्वीदेखील होणार आहे. यादिवशी कोणीही आपल्या घरावर आकाशकंदील लावू नये, या माध्यमातून आपला निषेध व्यक्त करायचा आहे, असे ते म्हणाले.
या बैठकीस माजी महापौर, मध्यवर्ती म.ए. समितीचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, शहर म. ए. समिती कार्याध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, समिती नेते रमाकांत कोंडुस्कर शिवराज पाटील, मदन बामणे, अमर येळ्ळूरकर, नेताजी पाटील, प्रकाश मरगाळे, शुभम शेळके, आदींसह समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.