बेळगाव लाईव्ह : एक नोव्हेंबर काळया दिनाच्या सायकल मिरवणुकी संदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची बैठक पोलीस कमिशनर याडा मार्टिन मार्बणियांग यांच्यासमवेत पार पडली.
या बैठकीत पोलीस आयुक्तांनी समितीच्या कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून माहिती घेतली. यावेळी समिती नेत्यांनी पोलीस आयुक्तांना माहिती देताना सांगितले, या आधी अनेक वर्षे काळ्या दिनी सायकल फेरी निघाली आहे. यादरम्यान कन्नड – मराठी असा वाद कधीही निर्माण झाला नाही. हा निषेध मोर्चा कर्नाटकाविरोधात नाही तर केंद्र सरकारने सीमावासीयांवर केलेल्या अन्यायाविरोधात आहे.
बेळगावमध्ये काही बाहेरील संघटना येऊन विनाकारण तेढ निर्माण करून गैरसमज पसरविण्याचे काम करत असून यामुळे पोलीस आणि प्रशासनांवर दबाव आणण्यात येत आहे. या सर्व संघटनांचा आणि तथाकथित कार्यकर्त्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. सालाबादप्रमाणे यंदाही सायकल फेरी ठरलेल्या मार्गाने, शांततेत पार पडेल, असा विश्वास पोलीस आयुक्तांना पटवून देण्यात आला.
समिती शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर पोलीस आयुक्तांनी सायकल फेरीला परवानगी दिली असून हि सायकल फेरी मूक असल्यामुळे कोणीही मोर्चात घोषणा देऊ नये, काळ्या दिनी मराठी भाषिकांनी आपल्या घरावर रोषणाई करू नये, आकाश कंदील लावू नयेत, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
या शिष्टमंडळात म. ए. समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील, नेताजी जाधव, नगरसेवक रवी साळुंखे, माजी नगरसेवक संजय शिंदे, भरत नागरोळी, उमेश काळे आदींचा समावेश होता.