बेळगाव लाईव्ह :शहापूर येथील बँक ऑफ इंडिया ते जुना पी. बी. रोडच्या महत्वाच्या प्रकरणानंतर गुरुवार 10 ऑक्टोंबर रोजी महापालिकेची सर्वसाधारण सभा होणार आहे.
गेले दीड महिने रस्ता प्रकरण गाजले असले तरी सर्वसाधारण सभेच्या विषय पत्रिकेवर त्याचा उल्लेख नाही.गुरुवारी सकाळी 11.30 वाजता महापौर सविता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या या सभेत एकूण 9 विषय आहेत.
त्यामध्ये 17 ऑगस्ट रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्ताला मंजुरी देणे, लेखा स्थायी समिती बैठकीच्या इतिवृत्ताला मंजुरी देणे, पंधराव्या वित्त आयोगातील निधीचा विनियोग, आझम नगरात आश्रम आणि मंदिर उभारण्यास मंजुरी देणे, एलअँडटी कंपनीकडून रस्ता दुरुस्तीला होत असलेल्या दिरंगाईबाबत आदी विषयांचा समावेश आहे.
या बैठकीत बँक ऑफ इंडिया ते जुना पी. बी. रोडपर्यंतच्या रस्त्याचा विषय अधिकृत चर्चेत नसला तरी या विषयावर सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार बाचाबाची होण्याची शक्यता आहे. आमदार अभय पाटील यांनी या रस्त्याबाबत सभागृहातच भुमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले होते.
त्यामुळे त्यावरही चर्चा होणार आहे.
गुरुवारी महत्वाची बैठक होणार असली तरी आयुक्त अशोक दुडगुंटी मात्र रजेवर गेले आहेत. त्यांनी अधीक्षक अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांच्याकडे भार सोपवला आहे. त्यामुळे महत्वाच्या सभेलाच आयुक्त उपस्थित राहणार नाहीत.