Saturday, December 21, 2024

/

मर्कंटाईल सोसायटीच्या वतीने कौतुक संध्या संपन्न

 belgaum

बेळगाव लाईव्ह -“विद्यार्थी मित्रांनी आयुष्यात जे व्हायचे आहे ते निश्चित ठरविण्याबरोबरच कष्ट उपसण्याची जिद्द ,चिकाटी ठेवावी. शारीरिक आणि मानसिक आरोग्य व चांगली नीतिमत्ता ठेवावी म्हणजे त्यांना आयुष्यात हवे ते आत्मसात करता येईल “असे विचार मंगेश होंडा चे मॅनेजिंग डायरेक्टर रोहित देशपांडे यांनी बोलताना व्यक्त केले.

मर्कंटाईल को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही सभासदांच्या पाल्यांचा आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या अनेकांचा सत्कार “कौतुक संध्या” कार्यक्रमात शनिवारी सायंकाळी करण्यात आला.

युनियन जिमखान्याच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमास पाहुणे म्हणून रोहित देशपांडे आणि नेक्सस इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट च्या मॅनेजिंग डिरेक्टर प्रीती पाटील या उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन संजय मोरे हे होते.

याप्रसंगी विद्यार्थ्यांना  देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले की, “मर्कंटाईल सोसायटी गेल्या पंचवीस वर्षात आर्थिक आणि सामाजिक योगदानाबरोबरच स्वरसंध्या, कौतुक संध्या यासारखे कार्यक्रम आयोजित करून समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी पार पाडीत आहे. 68 कोटीच्या ठेवी आणि 65 कोटी ची कर्जे वितरित करून त्यांनी कौतुकास्पद काम केले आहे. त्याचबरोबर सभासदांच्या मुलांचा गौरव करण्याची बांधिलकी त्यांनी जपली आहे त्यांच्या या कार्याचे मी कौतुक करतो.”

याप्रसंगी बोलताना प्रीती पाटील म्हणाल्या की,” कोविड आणि डिजिटल क्रांतीमुळे प्रत्येकासमोर नवनवी आव्हाने उभी राहिली आहेत. तुम्ही कोण आहात यापेक्षा तुम्ही जीवनात किती आनंदी राहणार आहात, उत्तम नागरिक बनून जीवन कसे जगणार आहात हेही महत्त्वाचे आहे.”
कार्यक्रमाची सुरुवात चेअरमन संजय मोरे यांच्या प्रास्ताविक व स्वागताने झाली. त्यांनी सोसायटीच्या प्रगतीचा आढावा घेतला. पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती फोटो पूजन झाल्यानंतर पाहुण्यांचा परिचय अनंत लाड यांनी करून दिला. मोरे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला.

Markantile
बेळगाव जिल्ह्यात दहावी परीक्षेत प्रथम आलेल्या तनिष्का नावगेकर, सुर नवा ध्यास नवा मध्ये दुसरा क्रमांक मिळवणारी अंतरा कुलकर्णी, व आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते पुंडलिक कुंडेकर यांचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यानंतर दहावी ,बारावी व पदवी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या 30 विद्यार्थ्यांचा पाहुण्यांचे हस्ते रोख रक्कम, सर्टिफिकेट व सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
संचालक प्रसन्ना रेवन्नावर यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमास सोसायटीचे संचालक किशोर भोसले, जयपाल ठकाई, सदाशिव कोळी, शाखा व्यवस्थापक व कर्मचारी वर्ग, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.