बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये मराठीला मिळणारा दुजाभाव किंवा जाणीवपूर्वक मराठी भाषेला देण्यात येणारी अपमानास्पद वागणूक हे काही नवे नाही. याचसाठी बेळगावमधील मराठी भाषिक येथील प्रशासकीय व्यवस्थेच्या विरोधात नेहमीच शड्डू ठोकून उभी असते.
आजदेखील महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत असा प्रत्यय आला असून महाराष्ट्र एकीकरण समितीचे नगरसेवक रवी साळुंखे यांनी थेट सभागृहातच मराठीच्या होत असलेल्या अवमानाविरोधात आवाज उठवत जाब विचारला.
बुधवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा महापौर सविता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभा सुरू होताच नगरसेवक साळुंखे यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेसाठी देण्यात येणाऱ्या नोटीस मध्ये असंख्य चुका असल्याचे आढळून आले आहे.
महापालिकेच्या नोटीशीतील चुकीच्या मराठीबाबत आक्रमक पवित्रा घेत रवी साळुंखे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी सभागृहात आपले म्हणणे मांडताना ते म्हणाले, सभागृहात अनेक मराठी नगरसेवक आहेत. आम्ही मराठीतून सभेची नोटीस मागितली आहे. पण, आम्हाला देण्यात येणाऱ्या सभेच्या नोटीशीत अनेक चुका असतात. आता तर या सभेत राष्ट्रपतींच्या परवानगीने येणारे विषय असे नमूद करण्यात आले आहे. या सभेत देशाच्या राष्ट्रपतींचा उल्लेख का करण्यात आला आहे, मराठीचा वारंवार का अपमान केला जातो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
महापालिकेत वारंवार मराठीचा अपमान केला जातो. तुम्ही दीड वर्षे मागणी करत असूनही भाषांतरकार नेमत नाही. आता महापालिकेच्या सभेत राष्ट्रपतींच्या परवानगीने येणारे विषय असे नमूद करून आणि चुकीचे शब्द वापरून मराठीचा का अपमान करता, असा जाब नगरसेवक रवी साळुंखे यांनी विचारला. साळुंखे यांच्या या विषयाला सत्ताधारी गटातील नगरसेवक रवी धोत्रे आणि संतोष पेडणेकर यांनी आक्षेप घेतला. ही चूक जाणीवपूर्वक झाली नसेल, अशी सारवासारव करत पेडणेकर यांनी अधिकाऱ्यांची बाजू घेत तुम्हीच मराठीतून नोटीस मागितली होती.
त्यानुसार मराठी नोटीस देण्यात येत आहे. त्यामध्ये काही प्रमाणात चूक झाली असेल, असे सांगितले. पण, त्यावर साळुंखे आणि विरोधी गटनेते मुजम्मील डोणी यांनी, मराठी भाषांतरकार नेमा म्हणून आम्ही अनेकदा मागणी केली. पण, तो नेमलेला नाही. त्यामुळे अशा चुका होत असून मराठीचा वारंवार अपमान होत आहे, असा आरोप केला.
अखेर महापौर सविता कांबळे यांनी यापुढे अशी चूक होणार नाही, यासाठी आपण अधिकाऱ्यांना सूचना करू, असे सांगितले. तर दोन वेळा जाहिरात देऊनही भाषांतरकार मिळाले नाहीत. पुन्हा एकदा जाहिरात देण्यात येईल, असे सांगितले.