Friday, January 3, 2025

/

द्विभाषिक फलक बसवण्यात का होत आहे दिरंगाई?

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर हे गाव सीमा भागातील मराठी भाषिकांच्या बालेकिल्ल्यांपैकी एक मानले जाते. मात्र याच गावातील लोकप्रतिनिधींना आपल्या माय मराठी भाषेबद्दल आदर, प्रेम, आस्था वगैरे काहीच नाही का? अशी शंका सध्या उपस्थित होत आहे.

मराठीसह द्विभाषेतील नामफलक बसवण्यात होत असलेली दिरंगाई हे याचे कारण असून सदर नामफलक ताबडतोब बसवण्यात यावेत, कशी जोरदार मागणी  ग्रा. पं. अध्यक्ष सतीश पाटील यांच्यासह समस्त मराठी भाषिकांकडून केली जात आहे.

आपल्या मागणी संदर्भात आज शुक्रवारी सकाळी बेळगाव लाईव्हला माहिती देताना येळ्ळूर ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष सतीश पाटील यांनी सांगितले की, येळ्ळूर ग्रामपंचायतीची 2020 -21 मध्ये स्थापना झाली त्यावेळी मी अध्यक्ष होतो त्यावेळी 15 व्या वित्त आयोग निधी अंतर्गत आम्ही गावात विविध विकास कामे हाती घेतली होती.Yellur

त्यामध्ये परगावच्या लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी गावातील रस्त्यांना नामफलक बसवण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्या अनुषंगाने नामफलक किती भाषेत असावेत? या संदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात आली. त्या बैठकीमध्ये फक्त मराठी भाषेतच फलक बसवण्याचा निर्णय सभागृहाने एकमताने घेतला.

त्यानुसार निधी मंजूर करून छ. शिवाजी महाराज रोड या गावातील मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यांना मराठी भाषेतील नामफलक बसवण्यात आले होते. मात्र त्याचवेळी निवडणुका लागल्यामुळे व आम्ही बसवलेले नामफलक फक्त मराठीतच असल्याने सरकारी आदेशावरून ते हटविण्यात आले.

तसेच नाम फलकासाठी सरकारी निधी वापरला जात असल्यामुळे सदर फलक मराठी बरोबर कन्नड भाषेत असले पाहिजेत अशी सूचना करण्यात आली. ही सूचना आम्ही तत्कालीन सभागृहाने मान्य केली. तसेच त्या अनुषंगाने मराठी व कन्नड अशा द्विभाषेतील फलकांच्या कामालाही सुरुवात केली. मात्र दरम्यान आमच्या सभागृहाचा कालावधी समाप्त झाला.

त्यानंतर नव्या सभागृहाने द्विभाषेतील फलक बसवण्याच्या आम्ही सुरू केलेल्या कामाचा पाठपुरावाच केला नसल्यामुळे आज जवळपास दीड वर्षे होत आली निधी मंजूर झालेला असताना देखील गावातील रस्त्यांना कन्नड व मराठी अशा द्विभाषेतील फलक बसविण्याच्या कामाची पूर्तता करण्यात आलेली नाही. परिणामी आम्ही बसवलेल्या फलकांची आणि त्या फलकांच्या खांबांची दुर्दशा झाली आहे.

यासंदर्भात विद्यमान सभागृहाच्या आजपर्यंत झालेल्या प्रत्येक मासिक बैठकीत मी व माझे सहकारी आवाज उठवून सदर नामफलक बसवण्याची मागणी करत आहोत. जनतेच्या सोयीसाठी हे नामफलक किती गरजेचे आहेत हे पटवून देत आहोत मात्र त्याची दखल घेतली जात नसल्याची खंत सतीश पाटील यांनी व्यक्त केली

सरकारच्या म्हणजे जनतेच्या पैशाच्या स्वरूपात आम्ही या नामफलकांसाठी निधी मंजूर केला आहे. तेंव्हा ते फलक बसवणे आवश्यक आहे असे सांगून देखील उडवाउडवीची उत्तरे देण्याद्वारे ग्राम विकास अधिकारी आणि विद्यमान सभागृहाकडून आमच्या मागणीकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे असे सांगून त्यामुळे मी तत्कालीन अध्यक्ष या नात्याने तसेच माझे सहकारी तत्कालीन सदस्य व विद्यमान उपाध्यक्ष प्रमोद पाटील, ग्रा. पं. सदस्य शिवाजी नांदुरकर, रमेश मेणसे, परशराम परीट, ज्योतिबा चौगुले, मनीषा घाडी, शालन तानाजी पाटील, सोनाली येळ्ळूरकर आदींनी मराठी व कन्नड नाम फलकांसाठी मंजूर करून घेतलेल्या निधीला काही अर्थच नाही का? असा प्रश्न उपस्थित करून माजी ग्रा. पं. अध्यक्ष विद्यमान सदस्य सतीश पाटील यांनी खेद व्यक्त केला.

दरम्यान मराठी कन्नड या द्विभाषेतील रस्त्यांचे नाम फलक ताबडतोब बसावेत या सतीश पाटील यांच्या मागणीला येळ्ळूर गावातील सुज्ञ, जाणकार नागरिकांसह समस्त मराठी भाषिकांनी संपूर्ण पाठिंबा व्यक्त केला आहे. तसेच येळ्ळूर ग्रामपंचायतचे विद्यमान सभागृह याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरेने आवश्यक कार्यवाही करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याची अंमलबजावणी न झाल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.