बेळगाव लाईव्ह :द मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगाव येथे 106 वा ‘शरकत दिन’ मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.
सदर वार्षिक कार्यक्रमात मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरने (तत्कालीन 114 मरहट्टा) घडविलेल्या शूर सैनिकांना आदरांजली वाहिली जाते. 1918 च्या मेसोपोटेमियन मोहिमेत बलिदान देणाऱ्या 114 मरहट्ट्यांनी त्यांचे शौर्य, धैर्य आणि अदम्य आत्म्याद्वारे एक अमर वारसा कोरला, ज्यासाठी बटालियनला “शरकत” हा प्रतिष्ठित युद्ध सन्मान देण्यात आला.
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या शरकत युद्ध स्मारकाच्या ठिकाणी आयोजित शर्कत दिन सोहळ्याप्रसंगी एमएलआयआरसी कमांडंट ब्रिगेडियर जॉयदिप मुखर्जी यांच्यासह ज्येष्ठ अधिकारी, सर्व हुद्यांवरील अधिकारी आणि जवानांनी कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली.
ही श्रद्धांजली म्हणजे ज्यांनी स्वतःच्या धैर्याने मराठा लाईट इन्फंट्रीचा वारसा घडवला त्यांच्याबद्दलचा आदर आणि स्मरणाचे प्रतीक होते. या प्रसंगी एक विशेष सैनिक संमेलन घेण्यात आले. ज्यामध्ये प्रशिक्षणार्थी बटालियनला उत्कृष्ट समर्पण आणि कामगिरीचा दाखला म्हणून शर्कत बॅनर प्रदान करण्यात आला.
सौहार्द मजबूतीकरण आणि अनुभवांची देवाणघेवाण करण्याची संधी देण्यासाठी यावेळी बाराखाना देखील आयोजित करण्यात आला होता. हा अनौपचारिक मेळावा रेजिमेंटमधील मजबूत बंधांची आठवण करून देणारा आणि स्वतःच्या वारशाचा अभिमान व कर्तव्याप्रती एक अतूट बांधिलकी दर्शवणारा ठरला.