बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-कर्नाटक राज्याच्या सीमेवर चेक पोस्ट नाके उभारले आहेत. या नाक्यावर पोलिस आणि गृहरक्षक दलाचे जवान बंदोबस्तासाठी नियुक्त केले आहेत.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र-कर्नाटक हद्दीवर चेक पोस्ट उभारण्यात आले असून या चेकपोस्टद्वारे निवडणुकीदरम्यान वाहतुकीच्या माध्यमातून होणाऱ्या गैरप्रकारावर नजर ठेवण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात १५व्या विधानसभेसाठी यंदा निवडणुका होत असून महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या प्रमुख पक्षांमध्ये फूट पडल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक असेल. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीकडे राज्यातीलच नव्हे, तर देशभरातील राजकीय विश्लेषकांचं लक्ष लागलेलं आहे.
भारतीय जनता पक्ष, शिवसेना एकनाथ शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची महायुती, तर दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व काँग्रेस यांची महाविकास आघाडी या दोन प्रतिस्पर्ध्यांमध्ये प्रामुख्याने ही निवडणूक होईल.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 तारखेला मतमोजणी होणार आहे.