बेळगाव लाईव्ह :बेळगावात 1924 मध्ये झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात महात्मा गांधींनी भूषविलेल्या अध्यक्षपदाच्या 100 व्या वर्धापन दिनानिमित्त येत्या डिसेंबरमध्ये बेळगाव येथे या अधिवेशनाचा शताब्दी सोहळा आयोजित करण्याचे नियोजन कर्नाटक काँग्रेसने केले आहे.
काँग्रेसच्या बेळगावातील त्या अधिवेशनाला मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे, कारण गांधींनी आपल्या हयातीत अध्यक्षपद भूषविलेले ते एकमेव अधिवेशन होते.
बेंगलोर येथे काल 2 ऑक्टोबर रोजी झालेल्या गांधी जयंती कार्यक्रमादरम्यान कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री एच. के. पाटील यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना बेळगाव येथील नियोजित सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्याची योजना जाहीर केली.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या सहकार्याने उत्सवाचे आयोजन करणारी समिती येत्या 24, 25 किंवा 26 डिसेंबरला प्रमुख भाषण देण्यासाठी ओबामा यांना बेळगावला आणण्यासाठी परिश्रमपूर्वक काम करत आहे.
गांधी जयंतीच्या भाषणात मंत्री एच. के. पाटील यांनी महात्मा गांधी यांचे ओबामा करत असलेल्या कौतुकावर भर दिला आणि या अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्षांनी गांधींना जागतिक प्रेरणास्थान म्हणून मान्य केल्याचा उल्लेख केला. ओबामांना निमंत्रित करण्यामागे जागरुकता वाढवणे आणि गांधींचा वारसा कमी करू इच्छिणाऱ्यांचा सामना करणे हा असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी यापूर्वी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या भाषणात कर्नाटक सरकार गांधींच्या चिरस्थायी प्रभावाचा सन्मान करण्यावर लक्ष केंद्रित करून, बेळगाव अधिवेशनाचा शताब्दी सोहळा संस्मरणीय आणि अर्थपूर्ण असेल याची खात्री करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे स्पष्ट केले आहे.