बेळगाव लाईव्ह:गुरुवारपासून सुरू होणारा शारदीय नवरात्र उत्सवासह दसरा सणाची बेळगाव शहरांमध्ये जय्यत तयारी सुरू असून यामध्ये कांगली गल्ली येथील एकता युवक मंडळ आघाडीवर आहे. हे मंडळ दसऱ्याला नवरात्रीनिमित्त दरवर्षी विविध वैशिष्ट्यपूर्ण देखावे करण्यासाठी सुप्रसिद्ध आहे. देखावा उभारण्याबरोबरच हे मंडळ शोभायात्रेचेही आयोजन करत असते. हे आपले वेगळे वैशिष्ट्य यंदा देखील जपणाऱ्या एकता युवक मंडळाने नवरात्र उत्सवाची जोरदार तयारी सुरू केली असून ‘पंढरपूरचा देखावा’ हे यावर्षीचे या मंडळाचे आकर्षण असणार आहे.
एकता युवक मंडळाकडून यावेळी हेमू कलानी चौक आणि कांगली गल्ली यांच्या प्रवेशद्वाराच्या ठिकाणी पंढरपूरचा भव्य देखावा उभारला जात आहे. यंदाच्या देखाव्याबद्दल बेळगाव लाईव्हला अधिक माहिती देताना एकता युवक मंडळ कांगली गल्लीच्या एकता युवक मंडळाच्या ह भ प चेतन चौगुले महाराज यांनी सांगितले की, बेळगावची नारायणी एकता युवक मंडळ कांगली गल्ली, बेळगाव यांच्याकडून यंदा पंढरपूरचा देखावा सादर केला जाणार असून श्री पांडुरंग परमात्मा आणि श्री रुक्मिणी मातेची मूर्ती स्थापन केली जाणार आहे. या भव्य देखाव्याद्वारे प्रति पंढरपूरच कांगली गल्ली येथे साकारणार आहे. त्याचप्रमाणे जसे आळंदीहून पंढरपूरला वारी काढली जाते, त्याप्रमाणे नवरात्रीचे नऊ दिवस दररोज संत श्री तुकाराम महाराज, संत श्री ज्ञानेश्वर महाराज, संत श्री नामदेव महाराज, संत श्री एकनाथ महाराज, संत मीराबाई अशा संतांच्या पालख्यांचा कार्यक्रम होणार आहे.
त्याचप्रमाणे दसऱ्याला घटस्थापने दिवशी राणी चन्नम्मा सर्कलपासून धर्मवीर संभाजी महाराज चौक (बोगारवेस) मार्गे कांगली गल्ली हेमू कलानी चौकापर्यंत श्री विठ्ठल -रखुमाईचा आगमन सोहळा अर्थात शोभायात्रा पार पडणार आहे. आळंदीहून पंढरपूरला जाताना श्री ज्ञानेश्वर माऊलींचे जे अश्व रिंगण पार पाडतात, ते शितोळे सरकारांचे अश्व या शोभायात्रेत सहभागी होणार आहेत.
या अश्वाचा उभा रिंगण सोहळा शोभायात्रेचे मुख्य आकर्षण असणार आहे. या रिंगण सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी बेळगाव जिल्ह्यातील सर्व वारकरी मंडळींना दिंडीसह निमंत्रित करण्यात आले आहे. या रिंगण सोहळ्यासाठी आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेतील वारकरी संप्रदायाची जवळपास सव्वाशे मुलं खास बेळगावला येणार आहेत. एकंदर कांगली गल्लीत यंदा प्रति पंढरपूर साकारणार आहे. ज्यामध्ये आळंदी, पंढरपूरचे वारीचे देखावे असणार आहेत.
श्री पांडुरंग आणि रखुमाईची मूर्ती, अश्वाचा रिंगण सोहळा, या सोहळ्याला उपस्थित राहणारे बेळगाव शहर व जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील दिग्गज वारकरी, गायक -वादक हे राणी चन्नम्मा सर्कल येथून सुरू होणाऱ्या आगमन सोहळ्याचे वैशिष्ट्य असणार आहे. तसेच म्हैसूर, बेंगलोर येथून कांतारा कलाकारांना निमंत्रित करण्यात आले आहे. या खेरीज श्रीराम, लक्ष्मण, सीता, श्रीकृष्ण, राधा, विठ्ठल -रखुमाई वेशभूषेतील पात्र शोभायात्रेतील चित्ररथात विराजमान असतील.
याव्यतिरिक्त नवरात्रीचा उत्सव महिलांचा असल्यामुळे नऊ दिवसांमध्ये हळदीकुंकू समारंभ, कुंकुमार्चन, कुमारिका पूजन असे महिलांसाठीचे विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. आपली हिंदू धर्म, संस्कृती आणि प्रथांचे जतन करणे हा या कार्यक्रमांच्या आयोजनाचा मुख्य उद्देश आहे. या खेरीज नऊ दिवस दररोज पहाटे काकड आरती, सकाळी पूजाअर्चा, दुपारी हरिपाठ होणार असून थोडक्यात आळंदी, पंढरपूर येथे जे नितीनियम पाळले जातात ते सर्व आम्ही या ठिकाणी पाळणार आहोत. तसेच सेवा करण्यासाठी आळंदी येथून खास 100 वारकऱ्यांना आम्ही मागवले आहे.
विविध धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने परगावचे मोठे संत, महाराज कांगली गल्ली येथे येणार आहेत. त्या अनुषंगाने येत्या 9 ऑक्टोबर रोजी प.पू. श्री महेंद्रनाथ महाराज यांचा प्रवचनाचा मोठा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. दसरा व नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने रविवारी 6 ऑक्टोबर रोजी महाप्रसादाचे आयोजन केले जाणार आहे अशी माहिती देऊन समस्त बेळगावकरांनी बेळगावची नारायणी कांगली गल्ली येथील महाप्रसादाचा बहुसंख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन एकता युवक मंडळाच्या पतीने सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण तोपीनकट्टी यांनी केले आहे.