बेळगाव लाईव्ह :राज्य सरकारच्या युवा सक्षमीकरण आणि क्रीडा खाते (डीवायईएस) बेळगावच्या ज्युडो खेळाडू साईश्वरी कोडचवाडकर आणि भूमिका व्ही. एन. यांच्यासह एन.आय.एस. प्रशिक्षक रोहिणी पाटील यांची कझाकिस्तान येथे येत्या दि. 10 ते 14 ऑक्टोबर 2024 या कालावधीत होणाऱ्या आशियाई खुल्या ज्युडो स्पर्धेसाठी भारतीय संघात अभिनंदनीय निवड झाली असून विशेष या स्पर्धेत रोहिणी यांना भारतीय संघाच्या प्रशिक्षक बनण्याचा बहुमान प्राप्त झाला आहे.
ज्युडो खेळाडू साईश्वरी कोडचवाडकर हिने केरळ येथे झालेल्या महिलांच्या दक्षिण विभागीय साखळी ज्युडो स्पर्धा -2023 मध्ये रौप्य पदकं आणि त्याच वर्षी बळ्ळारी येथे झालेल्या राज्यस्तरीय कॅडेट जुडो स्पर्धा 2023 मध्ये कांस्य पदक पटकावले आहे.
गेल्या मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या भारतीय जुडो महासंघाच्या खुल्या निवड चांचणीमध्ये साईश्वरी हिने चौथी मानांकन प्राप्त केले आहे. त्याच आधारे तिची आता कझाकिस्तान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तिला सरकारच्या युवा सक्षमीकरण आणि क्रीडा खात्याचे उपसंचालक श्रीनिवास बी यांचे प्रोत्साहन तसेच जुडो प्रशिक्षक रोहिणी पाटील आणि कुतुजा मुल्तानी यांचे मार्गदर्शन लाभत आहे. बे
ळगावची दुसरी जुडो खेळाडू भूमीका व्ही. एन. ही देखील डीवायएस बेळगावची सदस्या असून जिने केरळ येथील महिलांच्या साखळी ज्युडो स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक, त्याचप्रमाणे नवी दिल्ली येथे झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय ज्युडो स्पर्धेत रोप्य पदक पटकावले आहे.
ज्युडोमध्ये राष्ट्रीय पातळीवरील चौथे मानांकन प्राप्त असल्यामुळे तिची कझाकिस्तान येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सदर आंतरराष्ट्रीय ज्युडो स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय संघाच्या प्रशिक्षक म्हणून बेळगाव डीवायईएस केंद्राच्या प्रशिक्षक रोहिणी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रोहिणी पाटील यांनी आतापर्यंत अनेक राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील पदक विजेते जुडोपटू घडविले आहेत. कझाकिस्तान येथील आशियाई खुल्या ज्युडो अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय संघात 18 खेळाडू, दोन प्रशिक्षक आणि एका पंचाचा सहभाग असणार आहे. हा सर्व चमू येत्या बुधवार दि. 9 ऑक्टोबर 2024 रोजी नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कझाकिस्तानच्या दिशेने प्रयाण करणार आहे.