Monday, December 30, 2024

/

इस्कॉनच्या भागवत कथा महोत्सवाचा समारोप

 belgaum

बेळगाव लाईव्ह -” आपले जीवन सार्थक करायचे असेल तर त्यासाठी माणसाने प्रपंच सोडायची गरज नाही. त्याकरिता भक्तांच्या संगतीत येऊन श्रद्धेने, विनम्रपणे, भक्तीने आणि प्रेमाने भगवंतांची सेवा केली पाहिजे. त्यांच्या बाबतच्या कथा ऐकल्या पाहिजेत, त्यांचे नामस्मरण केले पाहिजे तर हळूहळू भगवंताबद्दलचे प्रेम उत्पन्न होईल आणि असे झाले तर हे संपूर्ण जग वृंदावन होऊन जाईल” असे विचार बेळगाव इस्कॉन चे अध्यक्ष परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांनी बोलताना व्यक्त केले.

जुने बेळगाव येथील तलावाच्या काठावर अतिशय निसर्ग वातावरणात श्री रामलिंगेश्वर समुदाय भावना समोरील कलमेश्वर देवस्थाना समोर संपन्न झालेल्या श्रीमद्भागवत कथा महोत्सवाचा समारोप महाराजांच्या उपस्थितीत कथाकथनाने झाला.

रविवारी रात्री शेकडो भक्तांच्या उपस्थितीत अतिशय भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झालेल्या या इस्कॉन आयोजित कथा महोत्सवात 23 ते 28 सप्टेंबर पर्यंत इस्कॉन चे भक्त श्री सुदर्शन प्रभुजी यांनी रोज सायंकाळी भगवान श्रीकृष्ण यांच्या जीवनावर कथा सांगितली होती. त्या कथा महोत्सवाचा समारोप करताना रविवारी भक्तीरसामृत स्वामी महाराज यांनी भगवान श्रीकृष्ण यांच्या जीवनातील बाललीलांची माहिती दिली. भगवंतानी वृंदावनात केलेल्या अनेक बाललीला सांगितल्या.

“भगवंतांना समजून घेण्यासाठी आपण श्रीमद्भागवतासारखे ग्रंथ वाचले पाहिजेत, त्यामध्ये शुक्रदेव गोसावी यांनी भगवंताच्या जीवनातील अनेक बाललीलांचे वर्णन केले आहे. भगवान हे पद नाही हे लक्षात घेतले पाहिजे भगवंतांनी बालवयातच पूतना वध, तृणावत वध, यमलार्जुन वृक्षाचे पडणे, बकासुराचा वध, कंसाचा वध, रुक्मिणी विवाह याचबरोबर इतर लीलांची माहिती दिली.

Iskcon
” भगवंतांचे वैशिष्ट्य असे की ते नेहमीच तरुण राहिले” असेही महाराज म्हणाले. भगवंतांना पान,फुल, पाणी, फळ किंवा इतर कोणत्याही सामान्य सामान्य गोष्टी भक्तिभावाने अर्पण केल्या तर ते त्याचा स्वीकार करतात. तेथे कोणत्याही आर्थिक, सामाजिक परिस्थितीचा संबंध येत नाही. असेही ते म्हणाले आदर्श भक्तीचा स्तर कसा असतो हे सांगण्यासाठी महाराजांनी फळ विक्रेत्या बाईची कथा सांगितली. त्या बाईने भगवंतांच्या वरील असीम प्रेमामुळेच त्यांना भगवंतांनी दिलेल्या मूठभर धान्याचे कसे हिरे मोती झाले हेही त्यांनी सांगितले. वृंदावनातील भक्ती ही अद्वितीय, अपूर्व अशी आहे हे सांगताना त्यांनी भक्तीचे दोन स्तर असल्याचे सांगितले.

आपली भक्ती नसेल तर आपल्याला भगवंत भेटू शकणार नाहीत तेथे गरीब- श्रीमंत असा कोणताही भेदभाव नाही. त्यांच्या लीला या अलौकिक व मधूर आहेत ते केवळ सात वर्षाचे असताना गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर उचलून धरला आणि प्रचंड पडणाऱ्या पावसापासून वृंदावन वासियांचे कसे संरक्षण केले हेही महाराजांनी सांगितले.

शेकडो स्त्री-पुरुषांची उपस्थिती लाभलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी सुरुवातीला महाराजांच्या हस्ते यमुना देवीची पूजा करण्यात आली त्याचबरोबर भजन, कीर्तन आदीही पार पडले. सर्वांसाठी प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कथा महोत्सवाने आपण तृप्त झालो अशी प्रतिक्रिया अनेक भाविकांनी व्यक्त केली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.