बेळगाव लाईव्ह : मागील आठवड्यात जिल्हा रुग्णालयात गेल्या सहा महिन्यात नवजात बालकांच्या मृत्यूप्रकरणी माहिती समोर आली आहे. याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाने जरी यात बीम्स प्रशासनाची चूक नसल्याचे स्पष्ट केले असले तरी याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी तसेच दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी अखिल भारतीय महिला सांस्कृतिक संघटना आणि अखिल भारतीय लोकशाही युवा संघटनेने एका निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
विविध मागण्यांचे निवेदन आज जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याकडे सदर संस्थांच्या वतीने सादर करण्यात आले. गेल्या सहा महिन्यांपासून सुमारे १२२ नवजात बालकांचा ऑक्सिजनविना मृत्यू झाल्याचा संशय आहे. बीम्सच्या अधिकाऱ्यांनी समिती स्थापन करून सरकारला अहवाल सादर करणे गरजेचे आहे.
बीम्स प्रशासकीय अधिकाऱ्यांनी येथील कॉम्प्रेसर नादुरुस्त असल्याचे कारण पुढे केले आहे. मात्र याप्रकरणी वेगळ्याच गोष्टी असल्याचा संशय बळावत असून बीम्स प्रशासनाच्या वतीने चुकीची माहिती देण्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
बीम्स मध्ये गर्भवती महिला, बाळंतीण, नवजात शिशु यांच्यावर योग्य उपचार केले जावेत, उपचारादरम्यान योग्य काळजी घेतली जावी, रुग्णालयात तज्ञ वैद्य आणि आवश्यक क्रर्मचाऱ्यांची नेमणूक केली जावी, रुग्णालयातील यंत्रसामुग्री योग्य पद्धतीने हाताळण्यात यावी, देखभाल करण्यात यावी,
सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे तातडीने उद्घाटन करून जनतेच्या सेवेत दाखल करण्यात यावे, रोग तपासणी, उपचार आणि औषधोपचार मोफत पुरविण्यात यावे यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
यावेळी संघटनेचे राजू गाणगी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.