Tuesday, October 22, 2024

/

हॅकिंग टाळण्यासाठी जागृत रहा, सुरक्षित रहा!

 belgaum

बेळगाव लाईव्ह :गेल्या आठवड्यात बेळगावमधील अनेकांचे व्हॉट्सॲप खाते हॅक झाले होते. त्यांनी ओळखीच्या क्रमांकावरून एका लिंकवर क्लिक केल्यामुळे तेही हॅक झाले होते. त्यानंतर त्यांच्या क्रमांकावरून त्यांच्या संपर्कांना (कॉन्टॅक्ट्स) विचित्र संदेश पाठवण्यात आल्यामुळे समस्या उद्भवली.

खालील कांही टिपा इतरांना सुरक्षित राहण्यास आणि व्हाट्सॲप व ऑनलाइन हॅक टाळण्यास मदत करण्यासाठी आहेत.

1) लिंक्सवर क्लिक करणे टाळा – जर तुम्हाला अज्ञात स्त्रोताकडून किंवा एखाद्या परिचित संपर्काकडून देखील कोणतीही लिंक मिळाली जी संशयास्पद वाटत असेल तर त्यावर क्लिक करू नका. हॅकर्स अनेकदा तुमची माहिती चोरण्यासाठी याचा वापर करतात.

2) दोन टप्प्यातील पडताळणी सक्षम करा – व्हाट्सॲप मध्ये दोन टप्प्यातील पडताळणी सक्षम करून सुरक्षिततेचा अतिरिक्त स्तर जोडा. त्यासाठी तुमच्या फोन नंबरसह पासकोड आवश्यक असेल. 3) पडताळणी कोड शेअर अर्थात सामायिक करू नका – तुमचा व्हाट्सॲप कोड कधीही कोणाशीही शेअर करू नका. त्याचा वापर स्कॅमर व्हाट्सॲप सपोर्ट किंवा तुमचे कॉन्टॅक्ट म्हणून भासवून तुम्हाला तुम्हाला फसवण्यासाठी करू शकतात.

4) मजबूत फोन सुरक्षा (सिक्युरिटी) वापरा – तुमच्या ॲप्समध्ये अनधिकृत प्रवेश टाळण्यासाठी तुमचा फोन मजबूत पिन, पासवर्ड किंवा बायोमेट्रिक लॉकसह लॉक करा. 5) सार्वजनिक वाय-फायच्या बाबतीत सावधगिरी बाळगा – असुरक्षित सार्वजनिक वाय-फाय वर व्हाट्सॲप वापरणे टाळा.Cyber police

कारण हॅकर्स तुमचा डेटा सहजपणे रोखू शकतात. रेस्टॉरंट, बस किंवा रेल्वे स्थानकांवर मोफत वाय-फाय धोकादायक ठरू शकते. 6) संशयास्पद मेसेज फॉरवर्ड करू नका – जर एखादा संदेश (मेसेज) खरा वाटत नसेल, मनाला पटत नसेल किंवा त्यात असामान्य मजकूर असेल तर तो फॉरवर्ड करू नका. तो फसवणूक -घोटाळ्याचा भाग असू शकतो.

7) अनोळखी नंबर ब्लॉक करा – जर तुम्हाला अनोळखी नंबरवरून अनोळखी किंवा संशयास्पद वाटणारे मेसेज आले तर, उत्तर न देता लगेच संबंधित नंबर ब्लॉक करा. 8) व्हाट्सॲप वेब मधून लॉग आउट करा – जर तुम्ही शेअर्ड किंवा सार्वजनिक संगणकावर व्हाट्सॲप वेब वापरला असेल तर काम पूर्ण झाल्यावर नेहमी लॉग आउट करा. 9) वैयक्तिक माहितीबाबत सावधगिरी बाळगा – बँक तपशील किंवा पासवर्ड यासारखी संवेदनशील वैयक्तिक माहिती कधीही व्हाट्सॲप वर शेअर करू नका, अगदी मित्रांसोबत देखील. 10) ऑटो-डाउनलोड बंद करा – प्रथम सेटिंग्ज त्यानंतर स्टोरेज आणि डेटा वर जा आणि मीडियासाठी ऑटो-डाउनलोड असक्षम करा. हे दुर्भावनापूर्ण फायली किंवा व्हिडिओ स्वयंचलितपणे डाउनलोड करणे प्रतिबंधित करते.

11) अनधिकृत संदेशांकडे दुर्लक्ष करा – व्हाट्सॲप किंवा तुमच्या बँका आणि विमा कंपन्या कधीही तुमचे वैयक्तिक तपशील किंवा पासवर्डची विचारणा करत नाहीत. पडताळणी केल्याशिवाय अधिकृत समर्थन असल्याचा दावा करणाऱ्या कोणत्याही संदेशांची दखल घेऊ नका. 12) स्पॅमचा रिपोर्ट अर्थात अहवाल द्या – जर तुम्हाला स्पॅम किंवा अनाहूत प्रचारात्मक संदेश प्राप्त झाले तर, प्रत्येकासाठी अशा क्रियाकलापांना अवरोधित करण्यात मदत करण्यासाठी व्हाट्सॲप मधील “रिपोर्ट” वैशिष्ट्य वापरा.

13) कधीही कस्टमर केअर अर्थात ग्राहक सेवा क्रमांक ऑनलाइन शोधू नका – बहुतेक कंपनीचे ग्राहक सेवा क्रमांक पावतीवरच छापलेले असतात. कधीही ऑनलाइन सर्च करू नका. कारण असे अनेक नंबर फसवे असतात. 14) ऑनलाइन पेमेंट्स लिंक केलेल्या तुमच्या बँक खात्यात कमी पैसे ठेवा – युपीआय सारख्या तुमच्या ऑनलाइन पेमेंटशी जोडलेल्या बँक खात्यात मोठ्या प्रमाणात पैसे ठेवणे टाळा.

15) कांहीही संशयास्पद वाटल्यास सीईएन पोलिस स्टेशनशी संपर्क साधा – पोलिस कधीही पोलिस स्टेशनमधून व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल करत नाहीत.

त्यामुळे अशा कॉलवर विश्वास ठेवू नका. सीईएन (सायबर, आर्थिक आणि अंमली पदार्थ गुन्हे शाखा) पोलीस विभाग खूप मजबूत, तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि सक्रिय आहे. ते तुम्हाला अशा कोणत्याही समस्यांमध्ये मदत करू शकतात. त्यामुळे 1930 हेल्पलाइन सायबर क्राईम बेळगाव सीईएन पोलीस स्टेशन : 0831-2950320 किंवा 9480804084 या क्रमांकावर तात्काळ फोन करण्यास अजिबात संकोच करू नका.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.