बेळगाव लाईव्ह:मागील महिन्यात श्री गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीप्रसंगी कपिलेश्वर उड्डाण पुलावर घडलेल्या ट्रॅक्टर अपघातात एकाचा घटनास्थळी मृत्यू तर अन्य दोघेजण जखमी झाले होते. दुर्दैवाने त्यापैकी एका जखमीचा आज सोमवारी दुपारी मृत्यू झाला आहे.
मयत गणेश भक्ताचे नांव विजय यल्लाप्पा राजगोळकर (वय 56) असे आहे. तेग्गीन गल्ली, वडगाव येथील रहिवासी असलेले विजय हे श्री गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी गेले असता अपघातग्रस्त झाले होते. श्री गणेश विसर्जन मिरवणुकीप्रसंगी कपिलेश्वर उड्डाणपुलाच्या ठिकाणी श्रीमूर्ती घेऊन जाणाऱ्या एक ट्रॅक्टर ब्रेक फेल होऊन अपघातग्रस्त झाला होता.
या घटनेत एकाचा मृत्यू होण्याबरोबरच विजय राजगोळकर यांच्यासह अन्य एक जण असे दोघे जखमी झाले होते. गंभीर जखमी झालेल्या विजय यांच्यावर प्रथम सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, त्यानंतर एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. नुकतेच त्यांना घरी आणण्यात आले होते.
प्रकृती बरी होत आहे असे वाटत असतानाच दुर्दैवाने आज सोमवारी दुपारी विजय यांचे राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. विजय राजगोळकर यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून कर्ता पुरुष हरपलेल्या या कुटुंबीयांबद्दल तेग्गीन गल्ली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान गणेशोत्सव काळातील घटनेमुळे गणेश भक्त विजय राजगोळकर यांच्या जीवावर बेतले हे लक्षात घेऊन शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी राजगोळकर कुटुंबीयांना आर्थिक तसेच अन्य माध्यमातून मदतीचा हात देण्यास पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले जात आहे.