Thursday, December 19, 2024

/

11 महिने होत आले तरी बेंगलोर -बेळगाव ‘वंदे भारत’चे स्वप्न अधुरे!

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेंगलोर ते बेळगाव या वंदे भारत एक्स्प्रेसची यशस्वी चांचणी होऊन 11 महिने उलटत आले तरीही बेळगावातील नागरिक या आश्वासक रेल्वे सेवेची व्यर्थ वाट पाहत आहेत.

गेल्या 21 नोव्हेंबर 2023 रोजी आठ डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे बेळगाव मार्गावर दाखल होऊन कमाल 110 कि.मी. प्रतितास वेगाने धावली. सदर रेल्वे त्यावेळी केएसआर बेंगलोर येथून पहाटे 5:45 वाजता निघाली आणि दुपारी 1:40 वाजता बेळगावला पोहोचली.

परतीच्या प्रवासात ही रेल्वे दुपारी 2 वाजता बेळगावहून सुटली आणि रात्री 10:10 वाजता पुन्हा बेंगलोरमध्ये परतली. ज्यामध्ये या रेल्वेचा धारवाड ते बेळगाव हा प्रवास अंदाजे 2 तास ते 2 तास 10 मिनिटांचा झाला.

या यशस्वी चांचणीने राज्याच्या राजधानीशी अधिक कार्यक्षमतेने जोडणाऱ्या उच्च-गती, आरामदायी रेल्वे सेवेची प्रतीक्षा असलेल्या बेळगावच्या लोकांमध्ये लक्षणीय उत्साह निर्माण केला. तथापि अखंड चांचणी होऊनही बेंगलोर-धारवाड वंदे भारत एक्स्प्रेसचा बेळगावपर्यंतचा बहुप्रतीक्षित विस्तार प्रत्यक्षात येऊ शकला नाही, ज्यामुळे या भागातील लोकांमध्ये घोर विश्वासघाताची भावना निर्माण झाली आहे.

धाडसी आश्वासने दिली गेली पण त्यानंतर निष्क्रियता आणि पोकळ आश्वासनाखेरीज कांही घडले नाही. वंदे भारतच्या बेळगाव पर्यंतच्या विस्ताराच्या बाबतीत आमचे निवडून आलेले लोकप्रतिनिधी केवळ विनंत्या करण्यात आणि मुदतवाढीबाबत पोकळ विधाने करण्यात सक्षम असल्याचे दिसते.

या विनंत्या केवळ ऐकल्या गेल्या किंवा फक्त बाजूला सारल्या गेल्या कारण त्यातून ठोस काहीही मिळालेले नाही. पुणे-हुबळी वंदे भारत याच मार्गावर यशस्वीपणे धावत असताना धारवाड ते बेळगावपर्यंतचा विस्तार विलंब आणि त्याला नोकरशाहीच्या अडथळ्यांचा विळखा अनाकलनीय आहे.

त्यामुळे बेळगावच्या लोकांना “आपण नेहमी मागे का राहतो?” असा प्रश्न पडतो. ज्या प्रदेशासाठी अत्यंत गरज आहे अशा प्रदेशात रेल्वेची वेळ कांही तासांनी वाढवणे इतके अवघड आहे का? धारवाड आणि बेळगाव दरम्यानच्या प्रवासाचा वेळ केवळ 2 तासांचा असल्याचे चांचणीच्या वेळी सिद्ध झाले आहे.

सदर रेल्वे कार्यरत होण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा (ऑपरेशनल इन्फ्रास्ट्रक्चर) बेळगाव येथे आधीच अस्तित्वात आहे. तरीही या शहरातील जनतेला कार्यवाही ऐवजी आश्वासने देऊन सोडले जात आहे. रेल्वेचा आधुनिक उपाय आवाक्याबाहेर असताना आपण कालबाह्य संथ पर्यायांवर किती काळ अवलंबून राहणार?

बेळगाव -बेंगलोर वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेची गेल्या वर्षीची चांचणी ही केवळ तांत्रिक चांचणीपेक्षा अधिक होती. कनेक्टिव्हिटी आणि विकासाच्या बाबतीत दीर्घकाळ दुर्लक्षित असलेल्या बेळगावसाठी ती आशेचे प्रतिक होती. मात्र आता जसजसा काळ पुढे सरकतो तसतशी ती आशा निराशेत आणि निराशेची रागात रूपांतरित होत आहे. बेळगावला पोरकं वाटत आहे.Vande bharat

खरंतर बेळगाव सारख्या ज्या शहराने राज्य आणि राष्ट्रासाठी मोठे योगदान दिले आहे, त्या शहराला पायाभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागू नये. आम्ही बेळगावची जनता जाब विचारत आहोत. आम्ही जबाबदारीची मागणी करत आहोत. आमच्या प्रतिनिधींनी फक्त विनंत्या करण्यापेक्षा बरेच काही केले पाहिजे, ज्याचे परिणाम मिळाले पाहिजेत.

ही कृती करण्याची वेळ असून अधिक सबब सांगण्याची नाही. अधिकाऱ्यांनी जागे होऊन या महत्त्वाच्या विस्ताराकडे दुर्लक्ष करणे थांबविले पाहिजे. आम्ही वंदे भारत बेळगावला परत येण्याची वाट पाहत असताना,

मदत करू शकत नसलो तरी आमच्या चिंतेकडे गांभीर्याने पाहिले जाणार? की या शहराला दिलेल्या इतर अनेक आश्वासनांप्रमाणेच ‘वंदे भारत’चे आश्वासन देखील कचऱ्याच्या टोपलीत संपणार? बेळगाव अधिक चांगल्यासाठी पात्र आहे. आम्ही अधिक चांगल्यासाठी पात्र आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.