बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील एका मंत्रिमहोदयांनी बेकायदेशीर जमिनी हडप केल्या आहेत, यासंदर्भातील कागदपत्रे पुराव्यानिशी लवकरच जाहीर करणार असल्याचा गौप्यस्फोट माजी आमदार आणि भाजपचे सरचिटणीस पी राजीव यांनी केला आहे.
आज बेळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. सदर मंत्र्यांबाबतच्या बेकायदेशीय जमीन व्यवहार प्रकरणी आपल्याकडे ७० टक्के कागदपत्रे असून संपूर्ण कागदपत्रे मिळाल्यानंतर हे सर्व प्रकरण जाहीर करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आमदारांनी केलेल्या या विधानामुळे बेळगावच्या राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ माजली आहे.
एकीकडे राज्यात मुडा प्रकरणी मुख्यमंत्री अडचणीत आल्याचे प्रकरण ताजे आहे तर बेळगावमधील बेकायदेशीर रस्ता बांधकाम प्रकरणी अजूनही गोंधळाचे वातावरण आहे.
अशातच पी. राजीव यांनी केलेल्या विधानानंतर ते मंत्री कोण? त्यांच्या बेकायदेशीर प्रकरणांचा उलगडा जाहीर झाला तर याचे बेळगाववर आणखी कोणते परिणाम होणार? बेळगावच्या राजकीय वर्तुळात कोणता नवा भूकंप येणार? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.