बेळगाव लाईव्ह : कर्नाटकासह महाराष्ट्र, गोवा, आंध्र, तामिळनाडू यासह देशभरातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील श्री रेणुकादेवस्थानात कोट्यवधी भाविक दर्शनासाठी येतात. या भाविकांच्या सोयीसाठी भक्तनिवास, अन्नछत्र, पार्किंग आणि दर्शन रांगेसाठी अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन आवश्यक त्या सर्व तयारी करत असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.
आज बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी उपरोक्त माहिती दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले, कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री यल्लम्मा देवस्थानाचा विकास तिरुपती-सुब्रमण्यम-धर्मस्थळच्या धर्तीवर करण्यात येणार आहे. यासाठी नुकतीच मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार, जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, पर्यटन मंत्री एच. के. पाटील आणि मुजराई विभागाचे मंत्री रामलिंग रेड्डी यांच्या उपस्थितीत श्री रेणुका यल्लम्मा पर्यटन विकास मंडळ आणि श्री रेणुका यल्लम्मा मतदारसंघ विकास प्राधिकरणाची बैठक यशस्वीपणे पार पडली.
या बैठकीत भाविकांच्या सोयीसाठी भक्तनिवास, अन्नछत्र, पार्किंग आणि दर्शन रांगेसाठी अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी चर्चा करण्यात आली. यल्लम्मा देवस्थानात वार्षिक यात्रोत्सवादरम्यान कोट्यवधी भाविक दाखल होतात.
सुरळीत आणि सुलभ दर्शन घेण्यासाठी दर्शन रांगेची व्यवस्था, दर्शन रांगेत विविध स्टॉल्स, यात्राकाळात येणाऱ्या भाविकांसाठी भक्तनिवास, एकाचवेळी ३५०० भाविकांची व्यवस्था होईल अशी निवारागृहे, २००० वाहने पार्क होतील अशी पार्किंग व्यवस्था, पौर्णिमेदरम्यान यल्लम्मा देवस्थान परिसरात येऊन स्वतः स्वयंपाक तयार करणाऱ्यांसाठी विशेष सुविधा, दररोज अन्नछत्र यासारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात चर्चा झाली. यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून मुख्यमंत्र्यांसमोर सदर आराखडा सादर करण्यात आला आहे.
धर्मस्थळ, तिरुपती आणि सुब्रमण्यम यासारख्या तीर्थक्षेत्रांच्या धर्तीवर यल्लम्मा देवस्थान देखील विकसित करण्यात येणार असून यासंदर्भातील ‘मास्टर प्लॅन’ तयार करण्यात आला आहे. यामध्ये काही सुधारणा करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या असून यावर लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे, तत्पूर्वी या सर्व योजना राबविण्यासाठी १०० दिवस आधी चाचणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.