बेळगाव लाईव्ह :आगामी 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देशाची राजधानी नवी दिल्ली येथे येत्या दि. 21, 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी फेब्रुवारी आयोजित करण्यात आले आहे. अ. भा. मराठी साहित्य संमेलनात महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते उपस्थित राहून सीमा प्रश्नाचा जागर करत असतात.
बेळगाव सीमा भागातील मराठी जनतेच्या व्यथावेदनान संदर्भात साहित्यिक आणि रसिकांचे लक्ष वेधून घेत असतात. यावेळी देशाच्या राजधानीतच अखिल भारतीय संमेलन आयोजित करण्यात आल्यामुळे या संमेलनात बेळगाव सीमा प्रश्नाचा आवाज बुलंद होणे आवश्यक आहे. या संदर्भात म. ए. समितीचे नेते आणि कार्यकर्ते वेळीच योग्य निर्णय घेतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला स्थानिकांसह आसपासच्या परिसरातून आणि महाराष्ट्रातून सुमारे 5000 रसिक येण्याची शक्यता आहे. संमेलनासाठी तालकटोरा इंडोर स्टेडियम हे स्थळ निश्चित करण्यात आले आहे. दिल्लीत रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम सुरू ठेवणे शक्य नसल्याने त्या दृष्टीने संमेलनातील कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत आहे. साहित्य संमेलनात एकाच वेळी तीन ते चार मंडपांमध्ये विविध कार्यक्रम सुरू असतात तसेच ग्रंथ प्रदर्शनाचाही स्वतंत्र मांडव असतो.
गतवर्षी अमळनेरला झालेल्या संमेलनात सगळ्या मांडवांमध्ये बरेच अंतर असल्याने एका मांडवातून दुसरीकडे जाताना रसिकांची आणि साहित्यिकांची दमछाक झाली होती. यंदा मात्र दिल्लीतील संमेलन स्थळ असणाऱ्या तालकटोरा स्टेडियमच्या परिसरात संमेलनाचे सर्व मांडव उभे करण्यात येणार असल्याने रसिकांची चांगली सोय होणार आहे. ग्रंथ प्रदर्शनाबाबतही प्रकाशकांची मते लक्षात घेऊन व्यवस्था आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
संमेलनाला महाराष्ट्रातून 2 ते 2.5 हजार साहित्य, रसिक येण्याची अपेक्षा असल्याने विशेष रेल्वे गाडी सोडली जावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. निवास व्यवस्थेसाठी महाराष्ट्र सदन, इंडिया इंटरनॅशनल सेंटर, जैन भवन आदी ठिकाणे उपलब्ध आहेत अशी माहिती संमेलनाचे संयोजक सरहद पुणे संस्थेचे अध्यक्ष संजय नाहर यांनी दिली आहे. या संमेलनाला देशभरातील साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
त्याचबरोबर देशाच्या राजधानीत होत असलेल्या या संमेलनात बेळगाव सीमा प्रश्नाचा आवाज उमटण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या प्रत्येक अखिल भारतीय साहित्य संमेलनाला बेळगाव येथील महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते आवर्जून उपस्थित राहतात आणि सीमावासियांच्या व्यथा वेदनांना वाचा फोडत असतात.
त्यामुळे यावेळी देशाच्या राजधानीतच होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी आत्तापासूनच चर्चा करून योग्य निर्णय घ्यावा आणि दिल्लीच्या तख्तावर पुन्हा एकदा सीमावासियांच्या आवाज बुलंद करावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.