बेळगाव लाईव्ह : दिवाळी सणानिमित्त घरोघरी, दुकानांमध्ये मोठ्या थाटामाटात लक्ष्मी पूजन केले जाते. त्यामुळे दिवाळीमध्ये फुलांची मोठी मागणी असते. लक्ष्मीपूजन, पाडव्यासाठी मोठ्या प्रमाणात फुलांचा वापर केला जातो.
घरोघरी पूजेसाठी देखील फुलांची मागणी असते. फुलांसाठी बेळगाव ही एक मोठी बाजारपेठ आहे. चांगला दर या ठिकाणी मिळत असल्याने राज्यभरातून फुले बेळगावमध्ये येतात. हुक्केरी, निपाणी, यरगट्टी, हावेरी, राणेबेन्नूर, बेंगळूर या ठिकाणाहून फुलांची मोठया प्रमाणात आवक होते. अशोक नगर येथील फुल मार्केट सह दिवाळीनिमित्त जुन्या पी बी रोड वर देखील फुलबाजार भरला असून याठिकाणी नानाविध प्रकारची फुले दाखल झाली आहेत.
हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण असणाऱ्या दिवाळी सणानिमित्त विविध साहित्याच्या खरेदीसह पूजेच्या साहित्याचीही मोठ्याप्रमाणात उलाढाल होते. याच पार्श्वभूमीवर बेळगावच्या फुल बाजारात विविध जिल्ह्यांतून विविध प्रकारच्या फुलांची शहरात आवक झाली आहे.
अनेकप्रकारची फुले बाजारपेठेत उपलब्ध झाली आहे मात्र पावसाचा फटका बसून पिकावर परिणाम झाल्याने फुलांचे दर चढेच आहेत. दिवाळीच्या निमित्ताने साजऱ्या केल्या जाणाऱ्या लक्ष्मी पूजनात केळीची रोपे, झेंडूची फुले तसेच नानाविध सजावटीच्या फुलांची गरज असते. बेळगावमधील फुल बाजारात चिक्कबल्लापूर, तुमकूरसह विविध जिल्ह्यांतून विविध प्रकारची फुले बेळगावात येतात.
मात्र जुन्या पी बी रोड वरील जिजामाता चौकात देखील दिवाळीनिमित्त फुलबाजार भरला असून याठिकाणी शेवंती, झेंडू , बटन फ्लॉवर, चॉकलेट फ्लॉवर, चांदणी फ्लॉवर यासारख्या अनेकविध फुलांनी ग्राहकांचे लक्ष वेधले आहे.
बेळगावच्या जुन्या पीबी रोडवर प्रत्येक वेळी शिरा, तुमकूर आदी ठिकाणाहून व्यापारी फुले विक्रीसाठी येतात. मात्र यंदा उत्पादन कमी असून गेल्या वेळेच्या तुलनेत बेळगावात व्यापाऱ्यांची आवक कमी झाली आहे. झेंडू 100 ते 150 रुपये किलो तर शेवंती 150 रुपये किलोने विकली जात आहे.
दरवर्षी बेळगावमध्ये परजिल्ह्यातून फुले घेऊन अनेक व्यापारी दाखल होतात. मात्र यंदा अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाचा फटका बसल्याने उत्पादनात घट झाली आहे. परिणामी फुलांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. पी. बी. रोडवर दाखल झालेल्या फुल व्यापाऱ्यांनी चिक्कबल्लापूर, बिडदल्ली, तुमकूर येथून फुले आणून विक्रीसाठी ठेवली आहेत.
गेल्या १० वर्षांपासून ते दिवाळीच्या तोंडावर फुलविक्री करण्यासाठी बेळगावमध्ये दाखल होत असल्याचे एका व्यापाऱ्याने यावेळी सांगितले. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा फुलांच्या दरात दुपटीने वाढ झाली असून ग्राहकांच्या खिशाला मात्र झळ बसत आहे.