बेळगाव लाईव्ह : राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे 13 ऑक्टोबर रोजी बेळगावातील प्रसिद्ध यल्लम्मा मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेणार आहेत…!
सध्या राज्यात मुख्यमंत्री पदाच्या बदलासंदर्भात जोरदार चर्चा सुरु असून या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सौंदत्ती येथील श्री रेणुकादेवीचे दर्शनासाठी येत नसतील ना ? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
सौंदत्तीचे आमदार विश्वास वैद्य यांच्या अथक परिश्रमातून सरकारने यल्लम्मा मंदिर विकास प्राधिकरणाची स्थापना केली असून प्राधिकरणाच्या वतीने 21 कोटी रुपये खर्चाच्या विविध कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते होणार आहे.
मात्र सध्या सिध्दरामय्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या धोक्याची अटकळ बांधली जात असून सतीश जारकीहोळी यांना मुख्यमंत्रीपद देण्यात येईल, अशा चर्चांनाही ऊत आला आहे.
विरोधकांकडून राजीनाम्याची होत असलेली जोरदार मागणी, मुख्यमंत्री पदासाठी सुरु असलेली अंतर्गत रस्सीखेच यामुळे मुख्यमंत्री थेट श्री रेणुकादेवीचा धावा करणार का? अशी चर्चाही जोर धरू लागली आहे.