बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेच्या सभागृहात आज प्रशासकीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महापौर सविता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली, उपमहापौर आनंद चव्हाण, मनपा अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर, उपायुक्त उदयकुमार यांच्यासह विविध अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नगरसेवकांनी अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त केला.
विविध प्रभागातील समस्या, विकासकामे यासंदर्भात नगरसेवकांकडून अधिकाऱ्यांना केल्या जाणाऱ्या सूचनांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप करत अधिकाऱ्यांच्या वेळकाढूपणाच्या वृत्तीवर नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केला. यावर महापौर सविता कांबळे यांनी अधिकाऱ्यांना सज्जड इशारा देत नगरसेवकांनी सुचविलेली कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले.
बेळगावमध्ये विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या सदनिकांमधील (अपार्टमेंट्स) तळघरातील पाण्याचे युजीडीला देण्यात आलेले कनेक्शन, पावसाळ्यात सांडपाण्याची उद्भवणारी समस्या, सकिंग मशीन च्या माध्यमातून महिनाभरापासून सुरु असलेले पाणी उपसण्याचे कामकाज यासंदर्भातील मुद्दा सभागृहात उपस्थित करण्यात आला. बांधकाम परवानगी देताना युजीडी लक्षात ठेवून परवानगी देण्याची मागणी नगरसेविका रेश्मा भैरकदार यांनी केली.
यासह रस्त्यावरील दुभाजकांवर दिसून येणारी अस्वच्छता, उद्यानातील कचऱ्याची विल्हेवाट, उद्यानाची स्वच्छता आणि निगा राखण्यासाठी माळी कामगारांची रखडलेली नियुक्ती, रस्ते विकासकामादरम्यान अडवलेले नाले, ब्लॉक झालेल्या वाहिन्या, रस्त्यांची दुरावस्था, नाल्याच्या स्वच्छतेकडे झालेले दुर्लक्ष यासह सार्वजनिक बांधकाम विभागाची रखडलेली कामे, बांधकामातील उर्वरित साहित्याचा इतर कामासाठी होत असलेला वापर अशा अनेक मुद्द्यांवर अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. नगरसेवकांचा रोष आणि तक्रारी लक्षात घेत महापौर सविता कांबळे यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेत नगर सेवकांनी सुचवलेली कामे विनाविलंब करावीत, असे आदेश दिले.
या बैठकीला नगरसवेक अजीम पटवेगार, रवी धोत्रे, वीणा विजापुरे, राजशेखर ढोणी, गिरीश धोंगडी, हणमंत कोंगाळी आदींसह विविध प्रभागाचे नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी उपस्थित होते.