बेळगाव लाईव्ह : सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयातील विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नीट – जेइ इ स्पर्धा परीक्षेसाठी तयार करण्यासाठी बेळगाव जिल्ह्यात सुरू झालेला “सीईटी-सक्षम” हा उपक्रम संपूर्ण राज्यासाठी आदर्श ठरला आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी व्यक्त केली.
सदर परीक्षांच्या अभ्यासासाठी शिमोगा जिल्ह्यातील एक पथक जिल्ह्यात दाखल झाले. बेळगाव जिल्हा उपसंचालक कार्यालय पीओ शिक्षण विभाग बेळगाव कार्यालयात “शिमोगा जिल्ह्यात सीईटी-सक्षम कार्यक्रमाची कार्यपद्धती अवलंबण्यासाठी, प्रोबेशनरी आयएएस अधिकारी दृष्टी जयस्वाल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सोमवारी भेट दिली.
ग्रामीण भागातील आणि जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी “सीईटी-सक्षम” नावाचा एक अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. जे विद्यार्थी शासकीय पूर्व-पदवीधर शाळांमध्ये विज्ञान शिकत आहेत त्या विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा खूप फायदा झाला आहे.
‘सीईटी-सक्षम’ उपक्रमाचे राज्यस्तरावरही कौतुक झाले. शिमोगा जिल्ह्यात “सीईटी-सक्षम” कार्यक्रम राबवण्यासाठी प्रोबेशनरी आयएएस अधिकारी दृष्टी जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली डीडीपी चंद्रप्पा गुंडपल्ली, प्राचार्य रविशंकर, डॉ. जीएस सिद्धलिंगमूर्ती, अरविंदकुमार के., वासुदेव के.एच., व्याख्याते राजेश बोलार, झाकीर हुसेन, फ्रान्सिस बेन्झाबिन, एसडीए भरत, डीपीएम प्रदीप यांनी भेट दिली.
आता बेळगाव जिल्ह्यातील गरीब विद्यार्थ्यांसाठी जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांनी आखलेला “सीईटी-सक्षम” हा अभिनव उपक्रम शिमोगा जिल्ह्यातही राबविण्यात येणार आहे.