बेळगाव लाईव्ह :महाराष्ट्रातील सांगली येथून अशोक लेलँड दोस्त या मालवाहू वाहनाच्या केबिनमध्ये दडवून बेकायदेशीररित्या हुबळी येथे नेण्यात येत असलेली तब्बल 2 कोटी 73 लाख 27 हजार 500 रुपयांची रोकड बेळगाव शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (सीसीबी) जप्त केल्याची घटना काल शुक्रवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
सचिन मेनकुदळे (रा. सांगली, महाराष्ट्र) आणि मारुती मारगुडे (रा. सांगली, महाराष्ट्र) अशी पोलिसांनी अटक केलेल्या दोघाजणांची नावे आहेत. बेळगाव शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग आणि दोन्ही पोलीस उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सीसीबीचे पोलीस निरीक्षक नंदिश्वर कुंबार आणि त्यांच्या पथकाने मिळालेल्या विश्वसनीय माहितीच्या आधारे काल शुक्रवारी सायंकाळी सांगली येथून हुबळीकडे निघालेला एक अशोक लेलँड दोस्त हे मालवाहू वाहन अडविले.
त्यानंतर पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता त्याच्या केबिनमध्ये बनवण्यात आलेल्या चोर कप्प्यात 2 कोटी 73 लाख 27 हजार 500 रुपयांची रोख रक्कम सापडली.
कोणत्याही आवश्यक कागदपत्रांशिवाय वाहतूक करण्यात येत असलेली ही रक्कम बेनामी अवैध असल्याचे निदर्शनास येताच सीसीबी पोलिसांनी ती वाहनासह जप्त केली.
तसेच याप्रकरणी उपरोक्त दोघाजणांना अटक केली आहे. याप्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून जप्त करण्यात आलेल्या पैशासंदर्भात अधिक तपास सुरू आहे.