बेळगाव लाईव्ह : शेतकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता पुन्हा हलगा-मच्छे बायपासचे कामकाज सुरु करण्यात आले असून या कामकाजादरम्यान येथील शेतकऱ्यांनी रुद्रावतार दाखवत मशिनी बाहेर घालवून पुन्हा एकदा विरोध व्यक्त केला आहे.
अलारवाड क्रॉसजवळ हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम करण्यासाठी पुन्हा कंत्राटदारांनी यंत्रसामुग्री जमा केली आहे. यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या 14 वर्षापासून हे प्रयत्न सुरू आहेत. त्याला शेतकऱ्यांनी विरोध करूनही अट्टहास सोडला जात नाही. सध्या न्यायालयाने स्थगितीही उठविली आहे. मात्र या रस्त्यामधील गेलेल्या जागेचे मालक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण झाले नाही. त्यामुळे रस्ता केला तरी भविष्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकार अडचणीत येणार हे निश्चित आहे.
उच्च न्यायालयाने स्थगिती उठविली आहे. त्यामुळे कंत्राटदार पुन्हा रस्ता करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत आहे. याप्रकारामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. सध्या शेतामध्ये पिके आहेत. त्यामध्ये जर यंत्रसामग्री घालून नुकसान केल्यास शेतकरी गप्प बसणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
अलारवाड क्रॉस येथे जेसीबीसह इतर यंत्र सामग्री तैनात करण्यात आली आहे. त्यामुळे कंत्राटदार हा रस्ता करण्याच्या तयारीत आहेत हे लक्षात येताच आज समिती नेते रमाकांत कोंडुसकर, शेतकरी नेते राजू मरवे, प्रकाश नायक, रवी पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी कंत्राटदार आणि उपस्थित अधिकाऱ्यांना जाब विचारून अखेर पुन्हा एकदा बायपासचे कामकाज बंद पाडले आहे.
झिरो पॉईंट फिक्स झाल्याशिवाय, शेतकऱ्यांशी चर्चा केल्या शिवाय कोणतेही काम करू नये. बायपास वर येऊनच शेतकऱ्यांशी चर्चा करावी,
शासकीय कागदपत्रे दाखवूनच कामाला सुरुवात करावी अन्यथा शेतकऱ्यांच्या उग्र संतापला सामोरे जावे लागेल, आणि होणाऱ्या परिणामासाठी तयार राहावे लागेल, असा निर्वाणीचा इशारा यावेळी उपस्थित संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे.