Friday, November 22, 2024

/

बोगस बीपीएल रेशनकार्डे रडारवर : अनेकांची बीपीएल कार्ड होणार रद्द!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : ज्यांचे वार्षिक उत्पन्न दोन ते तीन लाखांच्या आत आहे, अशी कुटुंबे बीपीएल कार्डसाठी पात्र आहेत. परंतु, सरकारी सुविधा आणि बाकीच्या फायद्यांसाठी ज्यांच्याकडे बंगला, गाडी व वार्षिक उत्पन्न ८ ते १० लाखांवर आहे, अशा व्यक्तीही बीपीएल कार्ड घेतल्याचे समोर आले आहे.

पंधरा दिवसांपूर्वी जिल्ह्यात २२ हजारांवर बोगस बीपीएल रेशनकार्डे रद्द करण्यात आली आहेत. राज्यातील ही आकडेवारी १४ लाख असून आणखीही अनेकांची कार्ड रडारवर असून तीदेखील लवकरच रद्द करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे यामध्ये ४ हजारांवर सरकारी अधिकारी व कर्मचारी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यात सर्वाधिक बोगस बीपीएल रेशनकार्डधारक बेळगाव जिल्ह्यात असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. राजकारण्यांचा वशिला तसेच अधिकाऱ्यांना हाताशी धरून जे पात्र नाहीत त्यांनीही बीपीएल रेशनकार्ड मिळवल्याचे समोर येत आहे. अनेकांनी स्वतःहून रेशनकार्डे जमा केली असली, तरी अद्याप अनेकांनी आपण गरीब आहोत, हे दाखवण्याचा अट्टाहास कायम ठेवला आहे. त्यामुळे अनेकांची बीपीएल कार्डे अद्याप समोर आलेली नाहीत.

दोन वर्षांपूर्वी अन्न व नागरी पुरवठा खात्याने जेव्हा बोगस बीपीएल कार्डे शोधण्यास प्रारंभ केला तेव्हा धक्कादायक आकडेवारी समोर येऊ लागली. अनेक श्रीमंतांनी वशिला लावून बीपीएल कार्डे घेतल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कार्ड देणे बंद ठेवून बोगस बीपीएल कार्ड शोधण्याची मोहीम राज्य शासनाने राबवली. राज्यभरात असंख्य बोगस बीपीएल कार्डधारक असल्याचे समोर आल्यानंतर गेल्या वर्षभरापासून नवीन कार्डवितरण बंद केले होते. महिनाभरापासून कार्ड वितरण सुरू केले आहे. परंतु, हे सर्व्हर अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू नाही. शिवाय यामध्ये अर्ज भरताना समोरची व्यक्ती खरोखरच बीपीएल रेशनकार्डसाठी पात्र आहे का, याचा विचार करून ऑनलाईन अर्ज भरून घेतला जात आहे. अर्ज भरल्यानंतर अन्न व नागरी पुरवठा खात्याचे निरीक्षक प्रत्यक्ष पत्यावर जाऊन मगच रेशनकार्ड देणार असल्याने आता विचाराअंती अर्ज भरले जात असल्याचे दिसून येत आहे.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री के. एच. मुनीयप्पा यांनी नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार राज्यात १४ लाख बोगस बीपीएल रेशनकार्डधारक आहेत. विशेष म्हणजे यामध्ये ४ हजार सरकारी नोकर आहेत. यापैकी आतापर्यंत ३ हजार जणांची रेशनकार्ड रद्द केली आहेत, याशिवाय अद्याप एक हजार सापडलेले असून याशिवाय देखील अनेक सरकारी नोकरांकडे बीपीएल रेशनकार्डे असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांचाही लवकरच शोध घेतला जाईल, असे मंत्र्यांनी सुतोवाच केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.