Wednesday, November 20, 2024

/

काळा दिनासाठी विभागवार जनजागृती -तालुका म. ए. समितीचा निर्णय

 belgaum

बेळगाव लाईव्ह: भाषावार प्रांतरचनेच्या वेळी केंद्र सरकारने बेळगावसह सीमा भागातील मराठी भाषिकांना कर्नाटकात डांबल्याच्या निषेधार्थ येत्या 1 नोव्हेंबर काळ्या दिनी काढण्यात येणारी मुक सायकल फेरी अभूतपूर्व व्हावी यासाठी बेळगाव तालुक्यामध्ये विभागवार जनजागृती करण्याचा निर्णय बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आज झालेल्या बैठकीत एकमताने घेण्यात आला. तसेच काळा दिन सायकलफेरीत कार्यकर्त्यांसह मराठी भाषिकांनी प्रचंड संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले.

खानापूर रोडवरील रेल्वे ओव्हर ब्रिज जवळील ओरिएंटल स्कूलच्या तुकाराम महाराज सांस्कृतिक भवनामध्ये आज रविवारी दुपारी झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बेळगाव तालुका म. ए. समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर हे होते. बैठकीचा प्रारंभी समितीचे चिटणीस एम. जी. पाटील यांनी सर्वांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले. त्यानंतर प्रथम समिती आणि सीमा लढ्याशी संबंधित व्यक्तींच्या निधनाबद्दल 2 मिनिटे मौन पाळून श्रद्धांजलीचा ठराव संमत करण्यात आला.

या ठरावाबरोबरच 1 नोव्हेंबर काळा दिन मूक मोर्चामध्ये कार्यकर्ते आणि मराठी भाषिक आणि बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन करणारा ठराव संमत करण्यात आला. याखेरीज चर्चेअंती काळादिन जनजागृतीसाठी आठ विभाग करण्यात येऊन त्या विभागांची जबाबदारी ठराविक पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर सोपवण्यात आली.त्यानुसार उचगाव विभागाची जबाबदारी आर. एम. चौगुले, दीपक पावशे व चेतन पाटील, बेळगुंदी विभागासाठी संतोष मंडलिक, डी. बी. पाटील, राजू किणेकर व डी. एस. पाटील, किणये विभागासाठी आर. के. पाटील, अनिल पाटील व मोनाप्पा पाटील, हालगा विभागासाठी मनोहर संताजी व विठ्ठल पाटील, सांबरा विभागासाठी रामचंद्र मोदगेकर व मनोहर संताजी, काकती विभागासाठी लक्ष्मण पाटील, तर कडोली विभागात जनजागृती मोहीम राबविण्याची जबाबदारी मनोहर हुंदरे व शिवाजी कुट्रे यांच्यावर सोपवण्यात आली.

यावेळी किणेकर म्हणाले, मध्यवर्ती समिती बैठकीत काळादिन पाळण्याचा निर्णय झाला. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्या ठिकाणी आम्ही काळ्यादिनाबाबत माहिती दिली. हा भाग मुंबई प्रांतात होता. पण अन्यायाने 1956 ला भाषावार प्रांतरचना करण्यात आली. त्यावेळी अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आला. त्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात आम्ही काळादिन पाळत आलो आहे, अशी माहीती दिली. पण जिल्हाधिकार्‍यांनी तुम्ही काळादिन दुसर्‍या दिवशी करा, असे सांगितले. त्यासाठी प्रशासन हट्टाला पेटले असून आम्हीही आमच्या मागणीवर ठाम आहोत.

Black day mes
आमची ताकद कमी पडत असल्यामुळे प्रशानसाची ताकद वाढली आहे. त्यांचा राज्योत्सव 1963 पासून होतोय, त्यामुळे तो कार्यक्रम तुम्ही दुसर्‍या दिवशी करा, असे आम्ही सांगितले आहे. आम्ही सुतक दिन पाळत आलो आहोत, त्यामुळे तो आम्ही 1 नोव्हेंबरलात पाळणार आहोत, त्यातून मागे हटणार नाही, असे सांगितले आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही 1 नोव्हेंबर रोजी काळा दिन करणार आहेत. त्यासाठी विभागवार बैठका घेवून जागृती करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

बैठकीत युवा नेते आर. एम. चौगुले, मनोहर संताजी, संतोष मंडलिक, शिवाजी खांडेकर, अनिल पाटील आदींनी समयोचित विचार व्यक्त करून कांही सूचना केल्या. तसेच काळा दिनाच्या सायकलफेरीत मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले. आपल्या अध्यक्षीय समारोपात माजी आमदार मनोहर किणेकर यांनी एक नोव्हेंबर काळा दिनाची पार्श्वभूमी थोडक्यात स्पष्ट करून येत्या 1 नोव्हेंबर रोजी कडकडीत हरताळ पाडून समिती कार्यकर्ते व मराठी भाषिकांनी मूक सायकल फेरीत प्रचंड संख्येने सहभागी होण्याद्वारे पुन्हा एकदा महाराष्ट्रात सामील होण्याची आपली तीव्र इच्छा प्रकट करावी असे आवाहन केले. बैठकीस बेळगाव तालुक्यातील म. ए. समितीच्या अन्य पदाधिकाऱ्यांसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.