बेळगाव लाईव्ह : राज्याच्या राजकारणाचे वारे वादळाप्रमाणे वाहू लागले आहेत. सिध्दरामय्यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार करण्यासाठी विरोधकांनी एकीकडे जोर लावला आहे, मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील इच्छुकांनी दिल्ली वाऱ्या सुरु केल्या आहेत तर काही विरोधक सत्ताधाऱ्यांच्या भेटीसाठी जात आहेत. यामुळे राजकारणाचे वारे एकाच दिशेने न वाहता चोहोबाजूने वादळाप्रमाणे वाहत असल्याचे दिसत आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निवासस्थानी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी भेट घेतली. यानंतर राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चांना ऊत आला. मात्र आज बेळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना बी. वाय. विजयेंद्र यांनी काँग्रेस सरकावर तोफ डागत ‘काँग्रेस सरकार गरीब आणि नालायक’ असल्याची टिप्पणी केली. सिद्धरामय्या आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील आणि याबाबतचे सत्य लवकरच समोर येईल, असा दावाही त्यांनी केला.त्यावेळी त्यांनी हरियाणा येथील भाजपच्या विजयाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, की हरियाणातील जनतेने मोदींच्या हमीभावावर विश्वास ठेवून काँग्रेसला नाकारले आहे. हरियाणातील भाजपचा विजय महाराष्ट्राच्या निवडणुकीतही वरचढच ठरेल. कर्नाटकात कोणताही विकास होत नसून काँग्रेस सरकार केवळ बेंगळुरू पुरते मर्यादित असल्याचा आरोपही बी. वाय. विजयेंद्र यांनी केला. काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतींवरून रस्सीखेच सुरु आहे. मुख्यमंत्र्यांच्या सोबत असणारे आमदारच त्यांच्या विरोधात असून काँग्रेस सरकार भ्रष्टाचारात बुडाले असल्याचा आरोपही बी. वा. विजयेंद्र यांनी केला.
भाजप प्रदेशाध्यक्षपदी आपली निवड झाल्याने बसनगौडा पाटील यत्नाळ आणि रमेश जारकीहोळी यांनी आपले नेतृत्व अद्याप मान्य केले नाही. काही लोक सहमती दर्शविण्यासाठी वेळ घेऊ शकतात. हायकमांडने आपल्याला मोठी संधी दिली असून पक्षाला सत्तेत आणण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.