बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरु झाली असून आज विधानसभा सभापती यु. टी. खादर आणि विधानपरिषद अध्यक्ष बसवराज होरट्टी यांनी सुवर्णसौधची पाहणी केली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत आज घेण्यात आलेल्या महत्वपूर्ण निर्णयांची माहिती देण्यात आली.
बेळगावमध्ये सालाबादप्रमाणे अधिवेशन भरविण्याचा निर्णय घेण्यात आला असून अधिवेशनाची तारीख मंत्रिमंडळ बैठकीत ठरवून मुख्यमंत्र्यांकडून जाहीर करण्यात येणार आहे. पूर्व तयारीसाठी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना देण्यात आल्या असून गेल्या वर्षी हे अधिवेशन उत्कृष्ट पद्धतीने पार पडले होते.
यानुसार यंदाही ते अधिक नीटपणे पार पाडण्यासाठी तयारी करावी, उत्तर कर्नाटकाच्या मुद्द्यांवर चर्चेसाठी अधिक वेळ राखून ठेवला जाईल, विधान मंडळाचे कामकाज सर्वांना पाहणे सोयीचे व्हावे यासाठी पावले उचलली जातील, मागील वेळेप्रमाणे शाळेतील मुलांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन, काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी महोत्सवाबाबत सरकार निर्णय घेणार, विधिमंडळ अधिवेशनात सकारात्मक चर्चा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी आणि कित्तूर चन्नम्मा विजयाच्या 200 व्या वर्धापन दिनानिमित्त सत्रादरम्यान छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन केले जाईल. अधिवेशनादरम्यान उधळपट्टीला आळा घालून अधिवेशनात नेहमीप्रमाणे आंदोलने, महत्त्वाच्या विषयांवर संबंधित विभागाच्या मंत्री स्तरावर चर्चा करण्याचे निर्देश दिले जातील, असे बसवराज होरट्टी यांनी स्पष्ट केले.
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 9 ते 20 डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता आहे. पण निश्चत तारीख अजून ठरलेली नाही. या पार्श्वभूमीवर तयारी सुरू करण्यात आली आहे. काँग्रेस अधिवेशन व इतर कार्यक्रम तयार होत असून आमदारांचा सहभाग वाढवण्यासाठी कारवाई करण्यात येत आहे. आमदार भवनच्या बांधकामासाठी योग्य प्रस्ताव तयार करून लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल, आमदार भवनासह कायमस्वरूपी पायाभूत सुविधांच्या उभारणीला प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेत आमदार आसिफ (राजू) सेठ, विधानसभा सचिव एम.के.विशालाक्षी, विधान परिषदेच्या सचिव महालक्ष्मी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमा शंकर गुळेद, डीसीपी रोहन जगदीश आदी उपस्थित होते. .