बेळगाव लाईव्ह : बेळगावचे माजी खासदार व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री कै. सुरेश अंगडी यांच्या प्रयत्नातून १९० कोटी रुपये खर्च करून रेल्वेस्थानकाचे नूतनीकरण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या रेल्वेस्थानकाचे उद्घाटन करण्यात आले. मात्र रेल्वेस्थानकावर पायाभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे प्रवाशांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
बाहेरून भव्यदिव्य इमारत दृष्टीस पडत असली तरी रेल्वेस्थानकाच्या आत मात्र सुविधांची वानवा भासत आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये नूतनीकृत रेल्वेस्थानकाचे उद्घाटन झाले. उद्घाटन होऊन दीड वर्षे उलटूनही अद्याप येथील प्लॅटफॉर्मवर छत घालण्यात आलेले नाही. यामुळे प्रवाशांना ऊन-पावसाचा सामना करत रेल्वेची वाट पाहावी लागते.
बेळगावमधून -बेंगळूर, बेळगाव-म्हैसूर व बेळगाव-मनुगुरू या एक्स्प्रेस बेळगावमधून सुरू आहेत. मात्र म्हैसुर – बेळगाव एक्स्प्रेसला दररोज एक तास उशीर होत आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
बेळगावच्या नव्याने बांधण्यात आलेल्या रेल्वेस्थानकात काही सुविधांचा अभाव असल्याचे आजवर अनेक प्रवाशांनी सांगितले आहे.
याबाबत नैऋत्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सूचना देखील करण्यात आली आहे. मात्र अद्याप याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.