Tuesday, January 14, 2025

/

दीपावलीच्या निमित्ताने फुलली शहराची बाजारपेठ!

 belgaum

बेळगाव लाईव्ह :प्रकाश, चैतन्य आणि मांगल्याचे वातावरण निर्माण करणाऱ्या दीपावलीच्या पर्वाला उद्या मंगळवारपासून प्रारंभ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सध्या बाजारपेठेत खरेदीसाठी तोबा गर्दी होत आहे. दिवाळीच्या निमित्ताने आकाश कंदील, आकर्षक तोरण, दिवे, पणत्या, रोषणाईच्या माळा, विभिन्न रंगाच्या रांगोळ्या, रेडीमेड फराळ, मिठाई वगैरेंनी दुकाने सजलेली दिसत आहेत.

दिवाळी उंबरठ्यावर आली असून सर्वत्र तयारीला वेग आला आहे. फराळ तयार करण्याची लगबग सुरू आहे. रंगीबिरंगी आकाश कंदील, रांगोळ्या, पणत्या, किल्ले बनवण्याचे सजावटीचे साहित्य आदींची सध्या जोरात खरेदी सुरू आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी आज सोमवारी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. गणपत गल्ली खडेबाजार, बुरुड गल्ली, पांगुळ गल्ली यासह शहराच्या विविध भागातील रस्ते गर्दीने फुलून गेले होते.

यंदा दिवाळीच्या खरेदीत कोणत्याही प्रकारची कसर राहू नये याची दखल घेत नागरिकांची दीपावलीसाठी आवश्यक साहित्याची खरेदी करण्यासाठी गेल्या दोन-तीन दिवसांपासून बाजारात गर्दी होत आहे. तसेच पूजेसाठी आवश्यक साहित्य विविध प्रकारचे विद्युत रोषणाचे साहित्य यासह विविध किराणा साहित्य खरेदीवर नागरिकांनी भर दिल्याचे दिसून येत आहे.

कपडा आणि सजावटीचे साहित्य याची मागणी देखील वाढली आहे. रात्री उशिरापर्यंत बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी होत असल्याने व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सज्ज ठेवली आहेत. विविध आकार व रंगाच्या आकाश आकर्षक आकाश कंदीलांबरोबरच इलेक्ट्रिकच्या वस्तूंचा सध्या बाजारपेठेत झगमगाट दिसत आहे. दिवे, पणत्या रोषणाईच्या माळांची खरेदी सध्या जोमात आहे. बाजारात यंदा भारतीय बनावटीच्या साहित्य बरोबरच चिनी रोषणाईच्या साहित्याला मागणी आहे. यंदा लाइटिंग असलेले तोरण सिंगल व मल्टी कलर लाइटिंग विक्रीस आली आहेत. त्यामुळे शहरातील गणपत गल्ली, पांगुळ गल्ली, मारुती गल्ली, मेणसे गल्ली, कडोलकर गल्ली, खडेबाजार आदी परिसरातील दुकानाबाहेर रोषणाईचा झगमगाट दिसून येत आहे.

दिवाळी सणाला सुरुवात झाल्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील चिमुकल्यांचा गड -किल्ले तयार करण्यासाठी उत्साह व्दिगुणीत झाला आहे. किल्ले तयार करण्यात मग्न झाला आहे. त्यामुळे बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध असलेले किल्ल्यावर ठेवण्यासाठी लागणारे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे विविध मावळे, तोफा, तयार किल्ले, प्लास्टिकचे प्राणी बालगोपाळांचे आकर्षण ठरत आहेत. दिवाळीचा सण रांगोळी शिवाय अपूर्ण आहे.Market

या पार्श्वभूमीवर दिवाळीसाठी नागरिकांकडून दिवाळीच्या इतर खरेदीसह रांगोळीचीही मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. त्या अनुषंगाने शहराठी ठिकाणी लहान मोठी रांगोळी विक्रीची दुकाने सजली आहेत. पांगुळ गल्ली, गणपत गल्ली, मारुती गल्ली, खडेबाजार, समादेवी गल्ली आदी ठिकाणी महिलांनी रांगोळीचे स्टॉल मांडले असून प्रत्येक स्टॉलवर गर्दी दिसून येत आहे.

वर्षभरात लोक दिवाळीची आतुरतेने वाट पाहत असतात. दिवाळी म्हटले की कुटुंबातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना फराळाची उत्सुकता लागलेली असते. यंदा रेडिमेड फराळ खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. त्यामुळे सध्या बाजारपेठेत तयार रेडीमेड फराळाची मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.