Sunday, November 24, 2024

/

बेळगावात बांगडा माशाची वाढती आवक; सुरू खवय्यांची सुगी

 belgaum

बेळगाव लाईव्ह:बेळगावच्या भुईकोट किल्ल्याजवळील मध्यवर्तीय होलसेल फिश मार्केट अर्थात मासळी बाजारामध्ये बांगडा माशाची आवक मोठ्या प्रमाणात वाढून दर घसरल्यामुळे आज शनिवारी सकाळी खरेदीसाठी एकच झुंबड उडाली होती. मासळी बाजारात आज बांगडा माशाची प्रति ट्रे 1000 ते 1700 रुपयांनी विक्री होत होती.

किल्ल्याजवळील मध्यवर्तीय होलसेल फिश मार्केटमध्ये बांगडा माशांची आवक वाढल्याच्या पार्श्वभूमीवर बेळगाव लाईव्हशी बोलताना बेळगाव होलसेल फिश मर्चंट असोसिएशनच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, बेळगाव हे महाराष्ट्र आणि गोव्यातील व्यापारासाठी मध्यवर्तीय ठिकाण पडते. येथून गोव्यातील पणजी, मडगाव, बेतून आदी बंदरांसह वेंगुर्ला, मालवण वगैरे ठिकाणची बंदरं 100 ते 150 कि.मी. अंतरावर आहेत.

त्यामुळे या बंदरांच्या ठिकाणी सायंकाळी पकडण्यात आलेले ताजे मासे किंवा रात्री उशिरा पकडलेले बांगडा मासे थेट बेळगावला पोहोचतात. यामुळे बेळगावला विशेष करून चविष्ट समजल्या जाणाऱ्या बांगड्याची मागणी जास्त असते. किल्ला येथील या मध्यवर्तीय मासळी बाजारामध्ये दररोज किमान 25 ते 30 टन आणि कमाल 50 ते 60 कधी 100 टनापर्यंत ताज्या बांगडा माशांची आवक होत असते.

विशेष म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात आवक होऊनही या माशाची संपूर्ण विक्री देखील होते. थोडक्यात बांगड्याच्या बाबतीत बेळगाव हे मोठे केंद्र आहे. बंदरातून या ठिकाणी आलेल्या मासे मग विक्रीसाठी बेळगाव जिल्ह्यातील खानापूर, हालशी, बिडी वगैरे ठिकाणी तसेच महाराष्ट्रातील कोल्हापूर व अन्य ठिकाणी रवाना केले जातात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व मच्छीमारी केंद्र जवळ असल्यामुळे बेळगावला एकदम ताजा मासा उपलब्ध होत असतो. परिणामी ताजेपणा व कमी दर यामुळे या ठिकाणची विक्री दिवसेंदिवस वाढत आहे. आणखी एक म्हणजे दरवर्षी बांगडा माशांचा जुलै अखेरपासून डिसेंबर अखेरपर्यंत असा ठराविक मोसम (सीझन) असतो. त्यानंतर किनारपट्टीवर बांगडा मासा मिळत नाही. बांगडा मासा वगळता 500 रु., 1000 रु. किलोने विक्री होणारे पापलेट, सुरमई वगैरे महागडे मासे बेळगावात फारसे चालत नाहीत. बांगडा मासा हा गरिबांना देखील परवडणारा असल्यामुळे त्याची मात्र प्रचंड विक्री होत असते.Fish

यावेळी फिश मार्केट मधील काही होलसेल मासे विक्रेत्या अधिक माहिती देताना म्हणाले की, किल्ला येथील हे फिश मार्केट बेळगाव जिल्ह्याचे मध्यवर्तीय फिश मार्केट आहे या ठिकाणाहून संपूर्ण जिल्ह्यात माशांचा पुरवठा केला जातो सध्या बांगड्यांची आवक जास्त आहे बांगडा माशासह सुरमई, मिश्र मासे या ठिकाणी येत असतात. सध्या सुरमई माशाचा दर सध्या 500 ते 550 रु. लहान माशाचा 300 -350 रु. असा दर सुरू आहे.

बांगडा माशाचा दर सुरुवातीला जास्त होता मात्र आता आवक वाढल्यामुळे गेल्या तीन-चार दिवसापासून 50 ते 80 रुपये होलसेल दरात बांगड्याची विक्री होत आहे. मिश्र माशांची आवक सध्या कमी आहे. या फिश मार्केटमध्ये गोड्या पाण्याचे मासे देखील येतात. थोडक्यात जवळपास सर्व प्रकारचे मासे आमच्या या बेळगावच्या फिश मार्केटमध्ये येत असतात.

बांगडा मासा खाण्याचा हा योग्य कालावधी आहे, कारण स्वस्त असण्याबरोबरच या काळात त्याची चव उत्कृष्ट असते. सध्या बांगड्याचा दर 1500 रु. बॉक्स असा सुरू आहे. महाराष्ट्रातील मालवण, रत्नागिरी, देवगड, नाटा येथून तसेच कर्नाटकातून देखील या ठिकाणी बांगड्याची आवक वाढल्यामुळे सध्या या माशाचा दर घसरला आहे. एसएमएचचा बोटीचा बांगडा हा अत्यंत उच्च गुणवत्तेचा कडक असतो आणि ज्याला पट्ट्याचा बांगडा म्हणतात जो होडीचा असतो तो थोडा नरम असतो. सध्या बोटीच्या बांगड्याचा दर स्थिर आहे तर होडीच्या बांगड्याचा दर घसरला आहे, असे विक्रेत्यांनी स्पष्ट केले. एकंदर बेळगावात बांगडा मासा मोठ्या प्रमाणात येऊ लागल्यामुळे शहरातील खवय्यांना सुगीचे दिवस आले आहेत. स्थानिक कॅम्प, कसाई गल्ली वगैरे फिश मार्केटसह फिरत्या विक्रेत्यांकडून गल्लोगल्ली बांगड्याची खरेदी तेजीत असल्याचे पहावयास मिळत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.