बेळगाव लाईव्ह :गेल्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने इतकी धुवांधार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे की या अवघ्या दोन दिवसात बेळगाव जिल्ह्यातील खानापूर, कित्तूर आणि सौंदत्ती या तालुका केंद्रांच्या ठिकाणी संपूर्ण ऑक्टोबर महिन्यातील सर्वसामान्य पावसाच्या सरासरीचे प्रमाण ओलांडले आहे.
यापैकी कित्तूर येथे तर परतीच्या पावसाने कहर केला असून या ठिकाणी आजपर्यंत संपूर्ण महिन्याच्या सर्वसामान्य सरासरीपेक्षा तब्बल 158.9 मि.मी. जादा पाऊस झाला आहे.
बेळगाव जिल्ह्यातील तालुका केंद्राच्या ठिकाणी असलेल्या पर्जन्यमापन केंद्राच्या ठिकाणी काल बुधवार दि.9 व आज गुरुवार दि. 10 ऑक्टोबर रोजी सकाळी नोंद झालेल्या पावसाची आकडेवारी हवामान खात्याने जाहीर केली आहे.
या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील मुडलगी वगळता सर्वत्र कमी-अधिक फरकाने चांगला पाऊस झाला आहे. मुडलगी येथे ऑक्टोबरची हिट कायम असून त्या ठिकाणी पाऊस अद्याप फिरकलेला नाही. खानापुरात दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात सर्वसामान्यपणे 136 मि.मी. पावसाची नोंद होते. मात्र काल आणि आज अशा दोन दिवसात या ठिकाणी 141.3 मि.मी. पाऊस पडल्यामुळे येथे आजपर्यंत एकूण 157.3 मि.मी. म्हणजे 21.3 मि.मी. जादा पाऊस नोंदविला गेला आहे. कित्तूर येथे सर्वसामान्यपणे ऑक्टोबरमध्ये 107.2 मि.मी. पाऊस होतो. मात्र या दोनच दिवसात कित्तूरमध्ये तब्बल 198.8 मि.मी. पाऊस कोसळल्यामुळे या ठिकाणच्या एकूण पावसाची नोंद 266.1 मि.मी. इतकी झाली आहे.
सौंदत्ती येथे देखील ऑक्टोबर मधील सर्वसामान्य 112 मि.मी. सरासरीच्या तुलनेत आत्तापर्यंत 3.6 मि.मी. जास्त पाऊस पडला आहे. जिल्ह्यातील तालुका मुख्यालय पर्जन्यमापन केंद्राच्या ठिकाणी दि. 9 व 10 ऑक्टोबर 2024 रोजी मिलिमीटर मध्ये नोंद झालेला पाऊस (अनुक्रमे पर्जन्यमापन केंद्र, ऑक्टोबरमधील सर्वसामान्य पाऊस, 9 रोजी पडलेला पाऊस, 10 रोजी पडलेला पाऊस, एकूण पाऊस यानुसार) पुढीलप्रमाणे आहे.
अथणी एचबीसी -103, 0.0, 2.0, 21.8. बैलहोंगल आयबी -123, 14.8, 43.4, 108.6. बेळगाव आयबी -136, 21.0, 56.6, 81.2. चिक्कोडी -114, 0.4, 13.4, 41.9. गोकाक -104, 0.0, 5.2, 6.4. हुक्केरी एसएफ -133, 4.3, 7.9, 56.6. कागवाड (शेडवाळ) -82.6 0.0, 0.0, 51.0. खानापूर -136, 51.8, 89.5, 157.3. कित्तूर -107.2, 36.4, 162.4, 266.1. मुडलगी 95.8, 0.0, 0.0, 0.0. निपाणी आयबी -99.7, 0.4, 32.0, 61.7. रायबाग -91, 0.0, 6.2, 10.4. रामदुर्ग -109, 0.0, 31.0, 67.7. सौंदत्ती -112, 9.6, 76.2, 115.6.