बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेची आज सर्वसाधारण बैठक पार पडली. या बैठकीत एल अँड टी कंपनीच्या कामकाजाच्या शैलीवर कडक ताशेरे ओढत अधिकाऱ्यांनाही जाब विचारण्यात आला. उपस्थित नगरसेवकांनी एल अँड टी कंपनीकडून होत असलेल्या विकासकामांनंतर रस्ते पूर्वपदावर दुरुस्त करण्यात येत नसल्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली.
शिवाय दक्षिण मतदार संघात एल अँड टी कंपनीमुळे अनेक रस्ते उखडले असून विकासकामासाठी उखडण्यात आलेले रस्ते जैसे थे ठेवण्यात आल्यामुळे अनेक अपघात घडत आहेत, नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, हि बाब प्रामुख्याने मांडण्यात आली. महापौर सविता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सुरुवातीला पदमविभूषण रतन टाटा आणि महापालिकेचे माजी कर्मचारी एच. बी. पीरजादे यांना वाहण्यात आली.
बैठकीत सर्वाधिक तक्रारी या एल अँड टी कंपनीच्या बाबतच करण्यात आल्याचे निदर्शनात आले. पाणीपुरवठा न करताच भरमसाठ बिले देणे, अनेक नागरिक नळजोडणीपासून वंचित असल्याने पाण्याची होणारी गैरसोय यासारख्या अनेक समस्यांचा पाढा या बैठकीत वाचण्यात आला. यामुळे एलअॅण्डटी कंपनीच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी वेगळी बैठक घेण्याचा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.
यावेळी नगरसेवक जयतीर्थ सवदत्ती यांनी अनेक ठिकाणी लागलेल्या गळत्यांबाबत मुद्दा उपस्थित केला. याचप्रमाणे दक्षिण आमदारांनी चन्नम्मा नगर परिसरात एलअॅण्डटीच्या कामांमुळे खराब झालेल्या रस्त्यांचा मुद्दा उपस्थित केला. तसेच ज्यांना नळ जोडण्या न देता भरमसाठ बिले देण्यात आली आहेत, त्यांची लवकरात लवकर बिले माफ करण्यात यावीत, अशी सूचना केली. त्यावर अधीक्षक अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांनी सांगितले कि, याबाबत सर्वे करण्यात आला आहे. त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल.
हेस्कॉमकडून 17 कोटी रुपये महापालिकेला येणे आहे. त्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही, असा आरोप नगरसेवकांनी केला. त्यावर पाच अधिकार्यांच्या समितीची या विषयावर बैठक झाली असून हा विषय आता जिल्हाधिकार्यांकडे गेला आहे. त्यांनी हेस्कॉमच्या व्यवस्थापकिय संचालकांशी चर्चा करून तोडगा काढणार आहेत. येत्या पंधरा दिवसात त्यावर निर्णय होईल, असे निपाणीकर यांनी सांगितले.
यावेळी सरकारकडून निधीत कपात झाली असल्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. अधिकार्यांनी पाठपुरावा करून निधी वाया जाणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना करण्यात आल्या. खासबाग येथील कचरा डेपोला अशोकनगर येथील डेपोचा निधी वळवण्याबाबत निर्णय घेण्यात आला. तर जीएसटी 8 कोटी भरायचा बाकी असून त्यासाठी वेळ मागितला आहे, असे लेखाधिकारी इरण्णा चंदरगी यांनी सांगितले.
यावेळी उपमहापौर आनंद चव्हाण दक्षिण आमदार उत्तर, आमदार यांच्यासह सत्ताधारी गटनेते गिरीश धोंगडी, विरोधी गटनेते मुजम्मील डोणी आदींनी सभेतील चर्चेत सहभाग घेतला.